नोंदणी नसलेल्या शेकडो वाहनांतून अवैध वाहतूक
By Admin | Updated: August 6, 2014 23:54 IST2014-08-06T23:54:39+5:302014-08-06T23:54:39+5:30
जिल्ह्यात पुन्हा एकदा काळीपिवळी प्रवासी जीपगाड्यांनी धुमाकूळ सुरू केला आहे. परिवहन विभागाच्या आशीर्वादाने जिल्ह्यात जवळपास ७०० काळीपिवळी जीपगाड्यांद्वारे प्रवासी वाहतूक सुरू आहे.

नोंदणी नसलेल्या शेकडो वाहनांतून अवैध वाहतूक
गोंदिया : जिल्ह्यात पुन्हा एकदा काळीपिवळी प्रवासी जीपगाड्यांनी धुमाकूळ सुरू केला आहे. परिवहन विभागाच्या आशीर्वादाने जिल्ह्यात जवळपास ७०० काळीपिवळी जीपगाड्यांद्वारे प्रवासी वाहतूक सुरू आहे. मात्र त्यापैकी केवळ २०० च्या आसपास गाड्यांनीच ‘फिटनेस सर्टिफिकेट’ घेतले आहे. परवाना न घेताच भंगाराच्या काढण्यासारख्या गाड्या बेधडकपणे धावत असल्यामुळे दररोज शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात येत आहे.
अडीच वर्षांपूर्वी तिरोडा तालुक्यात काळीपिवळी जीपला झालेल्या भीषण अपघातात १९ प्रवाशांचा बळी गेला होता. त्या अपघातानंतर जिल्ह्यात काळीपिवळी प्रवासी वाहतुकीवर कडक निर्बंध लावले होते. जर प्रवासी वाहतूक करायची असेल तर परवान्यात नमूद केल्याप्रमाणे (पाच अधिक एक) प्रवासी भरावे लागतील, असे सांगून त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाभरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते.
केवळ पाच प्रवाशांना घेऊन जाणे परवडणारे नसल्यामुळे नंतर वर्षभर काळीपिवळी गाड्या बंद होत्या. मात्र नंतर घरगुती वापराच्या गाड्यांसाठी मिळणाऱ्या परवान्याप्रमाणे प्रवासी गाड्यांनाही ९ अधिक १ प्रवासी वाहतुकीचा परवाना मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. अखेर नागपूर परिक्षेत्रातील सर्व काळीपिवळी गाड्यांना ९ अधिक १ चा परवाना देण्यात आला. परंतू गेल्या काही महिन्यात काळीपिवळी चालकांनी यापेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाण्याचा सपाटा लावला आहे.
गाडीत कितीही प्रवासी कोंबा, पण गाडीच्या बाहेर कोणीही लटकू नका, असे सांगत काळीपिवळी चालकांना देण्यात आलेली सूट पाहता कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काही दिवसात काळीपिवळी जीप व इतर प्रवासी वाहनांची संख्या बरीच वाढली आहे.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना आता या काळीपिवळी वाहनांनी व्यापून टाकले आहे. प्रत्येक रहदारीच्या मार्गावर काळापिवळा रंग दिलेली प्रवासी वाहने धावताना दिसतात. गोंदिया शहरात तर या गाड्यांमध्ये प्रवाशांना घेण्यासाठी चढाओढ लागलेली असते.
त्यातूनच ही वाहने भरधाव वेगाने निघतात. आधीच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले जातात. त्यातच भरधाव वेगाने गाडी हाकण्याच्या प्रकारामुळे वाहन अनियंत्रित होऊन अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिवहन व पोलीस विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अवैध प्रवाशी वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)