मुरुम व रेतीचा अवैध उपसा
By Admin | Updated: February 5, 2015 23:12 IST2015-02-05T23:12:19+5:302015-02-05T23:12:19+5:30
मुरूम व रेतीच्या अवैध चोरीला उत आला आहे. खुलेआम नदी-नाला काठावरून मुरूम व रेतीची तस्करी केली जात आहे. परंतु महसूल व वनविभागाच्या दुर्लक्षामुळे या माफियांचा जोर

मुरुम व रेतीचा अवैध उपसा
पांढरी/बाराभाटी : मुरूम व रेतीच्या अवैध चोरीला उत आला आहे. खुलेआम नदी-नाला काठावरून मुरूम व रेतीची तस्करी केली जात आहे. परंतु महसूल व वनविभागाच्या दुर्लक्षामुळे या माफियांचा जोर वाढतच चाला आहे. त्यामुळे आता ठोस कारवाईचीच गरज आहे.
पांढरी जवळील रेंगेपार परिसर नैसर्गिक वनसंपदेने नटलेले आहे. येथील नाल्यावर मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा आहे. व्यापारी वर्ग संगनमत करून या नाल्यातून रेतीचा अवैध उपसा करीत असतानाही महसूल व वन विभागाचे अधिकारी धृतराष्ट बनल्याचे दिसून येत आहे.
रेंगेपार नाल्यातून रेतीचा उपसा करून मालीजुंगा मार्गाने वाहतूक केली जात आहे. याची तक्रार वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांही करण्यात आली आहे. रेती चोरीवर आळा घालण्यासाठी येथील वनरक्षकांनी नाल्याकडे येणाऱ्या-जाणाऱ्या मार्गावर नाली घातली होती. मात्र रेती माफियांनी दुसऱ्या ठिकाणावरून रस्ता तयार करून रेतीचे उत्खनन करणे सुरूच ठेवले आहे. वन विभागाने काहीही कारवाई न केल्यामुळे रेती माफियांचा जोर वाढत आहे.
बाराभाटी जवळील पंचवटी (देवलगाव) या ठिकाणी खुलेआम मुरुमाची तस्करी दिवसाढवळ्या, रात्री-बेरात्री २३ जानेवारीपासून सुरु आहे. परिसरातील पदाधिकारी दुर्लक्ष करीत असल्यानेच मुरुमाची अवैध वाहतूक सुरू आहे. पण या वाहतुकीला आळा घालण्यासाठी कुणीच पुढाकार घेत नाही. अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अवैध धंद्यांना ऊत आला आहे. अधिकारी वर्ग तर आपले डोळे बंद करुन प्रशासकीय कार्यात मग्न आहेत. याचाच फायदा परिसरातील खासगी कंत्राटदार घेवून मुरुमाची अवैध वाहतूक करीत आहेत. सदर अवैध वाहतुकीबाबद तहसीलदारांना माहिती दिल्यावर ते कारवाई करू म्हणतात, मात्र काहीच करीत नाही.
परिसरामध्ये तलाठी कार्यालय देवलगाव साजा-६ असून या कार्यालयाचे तलाठी कोणते काम करतात, हे कळतच नाही. कधी- कधी तर कार्यालय बंदच दिसतो, असे नागरिक सांगतात. या सर्व बाबींना तहसील कार्यालयाचे अधिकारी जबाबदार आहे. त्यांचे कर्मचाऱ्यांवर वचक नसल्यामुळे प्रशासकीय कामात अनागोंदी कारभार सुरु दिसतो.
मुरुमाचे अवैध उत्खनन पंचवटी (देवलगाव) परिसरात जेसीबी व मजुरांच्या सहकार्यातून केले जात आहे. मुरुम खोदकाम सुरूच असून सदर अवैध मुरुम स्थानिक प्रशासनाच्या कामासाठी व खासगी कार्यासाठी चोरले जात आहे.
मुरूमाचे अवैध उत्खनन थांबवून अवैध वाहतूक तत्काळ बंद करण्यात यावी, उत्खनन होण्याऱ्या स्थळांची पाहणी करण्यात यावी व चौकशी करुन शासकीय नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)