तुम्हाला त्रास होतो, मग तुम्हीच पकडा डुक्कर
By Admin | Updated: March 6, 2015 01:40 IST2015-03-06T01:40:34+5:302015-03-06T01:40:34+5:30
डुकरांमुळे पसरलेल्या ‘स्वाईन फ्लू’ या जीवघेण्या आजाराने सर्वत्र दहशत पसरविलेली असताना गोंदियाकरांनीही त्याचा धसका घेतला आहे.

तुम्हाला त्रास होतो, मग तुम्हीच पकडा डुक्कर
गोंदिया : डुकरांमुळे पसरलेल्या ‘स्वाईन फ्लू’ या जीवघेण्या आजाराने सर्वत्र दहशत पसरविलेली असताना गोंदियाकरांनीही त्याचा धसका घेतला आहे. त्यामुळे शहरात प्रत्येक रस्त्यावर वावरणाऱ्या डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी आता नगर परिषदेने आगळावेगळा उपाय शोधून काढला आहे. ही मोकाट डुकरे पकडण्यासाठी नागरिकांनाच खुले आवाहन केले आहे. या आवाहनात संबंधित व्यक्तीला पोलीस संरक्षणही देणार असल्याची नोंद केली आहे. मात्र स्वत:ची जबाबदारी झटकून नागरिकांनाच डुकरे पकडण्याचे आवाहन करण्याचा नगरपरिषदेचा हा पवित्रा हास्यास्पद ठरला आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात अनेक लोक डुक्कर पाळण्याचा व्यवसाय करतात. यामुळे बघावे तिकडे डुकरांचा मुक्त वावर दिसून येतो. सध्या स्वाईन फ्लूने सर्वत्र कहर केला असून जिल्ह्यातही स्वाईन फ्लूने एकाची प्राणहानी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अशात शहरातील डुकरांमुळे शहरवासीय दहशतीत वावरत आहेत. शहरातील मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा, डुकरांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नगर परिषदेची असताना न.प.ने यावर कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे काही राजकीय पक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणीही केली.
अशात नगरपरिषेदेने वाढता दबाव पाहता डुक्कर निर्मूलनासाठी काहीतरी करीत असल्याचे भासवत डुक्कर पकडण्यासाठी इच्छुक लोकांनी नगर परिषदेकडे संपर्क साधण्याचे खुले आवाहन केले आहे. (शहर प्रतिनिधी)
अशा आहेत न.प.ने ठरवून दिलेल्या अटी
गोंदिया नगर परिषदेने डुकरांना पकडण्यासाठी केलेल्या आवाहनातील सूचनापत्रात काही अटी नमूद केल्या आहेत. त्यात ज्या व्यक्तींने डुक्कर पकडले त्या व्यक्तीचा त्या डुकरावर अधिकार राहणार, मोकाट डुकरांना पकडून त्यांना इतरत्र घेऊन जाण्यासाठी येणारा खर्च संबंधित व्यक्तीलाच करावा लागणार, मोकाट डुकर पकडण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. दररोज पकडण्यात आलेल्या डुकरांची आकडेवारी त्या व्यक्तीला नगरपरिषदेला द्यावी लागणार, डुक्कर पकडताना कुणीही डुक्कर पकडणाऱ्यांसोबत अभद्र व्यवहार केल्यास पोलीस व नगरपरिषद कार्यालयाला माहिती द्यावी लागणार. त्यानंतर मोकाट डुक्कर पकडणाऱ्यांना पोलीस संरक्षण दिले जाणार, अशा अटी न.प.ने घालून दिल्या आहेत. मात्र या भानगडीत सामान्य नागरिक पडतील का? याचा विचार न.प.ने केलेला नाही.
डुक्कर पकडणाऱ्यांना मारहाण आणि धमकी
नगरपरिषदेने डुक्कर पकडून त्यांना बाहेर पाठविण्यासाठी यापूर्वी मालेगाव (नाशिक) येथून पथक बोलविले होते. त्या पथकाने काही ्डुक्कर पकडले होते. मात्र येथील डुक्करपालकांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून मारहाणीची धमकी दिली होती. डुक्कर पालकांच्या धमकावणीमुळे पथक परत निघून गेले व डुक्कर पकडण्याची मोहीम फिस्कटली होती. सुमारे दोन वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकारानंतर कुणीही डुक्कर पकडण्यासाठी पुढे आले नाही. नगरपरिषदेनेही त्यानंतर डुक्कर पकण्याची मोहीम शहरात राबविली नाही. यंदा मात्र स्वाईनफ्लुमुळे नगरपरिषदेवर शहरवासीयांसह राजकीय पक्षांचा दबाव वाढत आहे. त्यामुळेच नगरपरिषदेने हा अफलातून प्रयोग डोक्यात आणल्याचे दिसून येत आहे.