समित्या गठित न झाल्यास मदतीला मुकावे लागणार
By Admin | Updated: August 4, 2014 23:50 IST2014-08-04T23:50:02+5:302014-08-04T23:50:02+5:30
शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम राबविण्यासाठी गावागावात तंटामुक्त समित्या गठित केल्या जातात. मात्र अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राजकारण आड येत असल्याने समिती गठित

समित्या गठित न झाल्यास मदतीला मुकावे लागणार
तंटामुक्त मोहीम : समिती गठणासाठी ३० आॅगस्ट पर्यंत कालावधी
गोंदिया : शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम राबविण्यासाठी गावागावात तंटामुक्त समित्या गठित केल्या जातात. मात्र अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राजकारण आड येत असल्याने समिती गठित करण्यास मोठा विलंब होतो. १५ ते ३० आॅगस्ट दरम्यान समिती गठित करणे गरजेचे आहे. ज्या गावांनी ३० आॅगस्टपर्यंत समिती गठित न केल्यास त्या गावांना लेखनसामुग्रीची मदत मिळणार नाही.
महाराष्ट्र शासनाच्या १४ आॅगस्ट २००८ च्या अनुसार मोहीम राबविण्यासाठी गावागावात ३० आॅगस्टपर्यंत तंटामुक्त समिती गठित करणे गरजेचे आहे. प्रत्येक समितीचा कार्यकाळ एक वर्षाचा आहे. परंतु समितीमधील पूर्ण सदस्य बदलविता येणार नाही असे शासनाचे धोरण आहे. एक तृतीयांश सदस्यच आवश्यकता वाटल्यास हे सदस्य बदलविता येतात.
तंटामुक्त गाव मोहिमेत जे सदस्य रस घेत नाहीत, सभेला हजर राहात नाही व जे सदस्य गुन्हेगार प्रवृत्तीचे असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल असेल अश्या सदस्यांना समितीतून काढता येते. या समितीवर गावातील शांतीप्रिय व चारित्र्यवान व्यक्ती यावा यासाठी गोंदिया जिल्ह्यातील तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी चारित्र्यप्रमाणपत्राची अट घालण्यात आली आहे. १५ ते ३० आॅगस्ट दरम्यान समितीत फेरबदल करून नवीन समिती गठित करणे गरजेचे आहे.
हल्ली तंटामुक्त अध्यक्षाला गावात मोठी सन्मानाची वागणूक असल्याने या अध्यक्षपदासाठी चढाओढ सुरू झाली आहे. या मोहीमेत अध्यक्षपदासाठी विविधि राजकीय पक्षाचे कार्यकर्तेही मोर्चेबांधणी करीत आहेत. अध्यक्षपदासाठी राजकारण्यांचा हस्तक्षेप झाल्याने गावागावात अध्यक्ष निवडतांना तणावाचे वातावरण असते. शांतीप्रिय गावासाठी निवडण्यात येणाऱ्या अध्यक्षाच्या निवडीसाठी वाद होणे हे योग्य नाही. तंटामुक्त अध्यक्षाची निवड करतांना गावातील सर्व नागरिकांना चालेल, कोणत्याही पक्षाचा नाही, गावातील जेष्ठ नागरिक व स्वच्छ चारित्र्याचा असल्यास त्या व्यक्तीची अविरोध निवड होते. तंटामुक्त अध्यक्ष निवडतांना निवडणूक न घेता अविरोध अध्यक्षाची निवड करणे गरजेचे आहे. शासन निर्णयाच्या अधिन राहून अध्यक्षाची व समितीच्या सदस्यांची निवड करणे सोयीस्कर राहील.अन्यथा त्या गावांना लेखन सामुग्रीची राशी दिली जाणार नाही.
(तालुका प्रतिनिधी)