गोंदियात अज्ञातांकडून श्रीरामाच्या मूर्तीची विटंबना; परिसरात तणावपूर्ण शांतता
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 16:41 IST2020-02-07T16:40:14+5:302020-02-07T16:41:50+5:30
गावकऱ्यांकडून तक्रार दाखल; मूर्तीच्या विटंबनेचा निषेध

गोंदियात अज्ञातांकडून श्रीरामाच्या मूर्तीची विटंबना; परिसरात तणावपूर्ण शांतता
गोंदिया: गिधाडी येथील श्रीराम मंदिरातील भगवान श्रीरामाच्या मूर्तीची अज्ञात इसमांनी तोडफोड केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण शांतता असून गावात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
गिधाडी येथे मुख्य रस्त्यालगत श्रीराम मंदिर आहे. या मंदिरात गावकरी दररोज पूजा करतात. शुक्रवारी (दि.७) सकाळी ८ वाजताच्या सुमारास गिधाडी येथील देवलाबाई जिवनलाल पटले (५५) या मंदिरात पूजा करण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान त्यांना श्रीरामाच्या मूर्तीची विटंबना झाल्याचे आढळले. या प्रकाराने त्या काही क्षण घाबरल्या. त्यांनी याची माहिती गावातील धमेंद्र चव्हाण, रंजीत तांडेकर, रामकृष्ण कटरे, प्रमोद उदापुरे, धर्मराज टेंभरे यांना दिली. यानंतर ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. माहिती मिळताच गावकऱ्यांनी बसस्थानकाजवळ असलेल्या श्रीराम मंदिराकडे धाव घेतली. यामुळे मंदिरासमोर गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
श्रीरामाच्या मूर्तीची तोडफोड करुन धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा गावकऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला. तसेच या घटनेतील आरोपींचा त्वरित शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार गिधाडी येथील विजय पारधी यांनी गोरेगाव पोलीस स्टेशन येथे नोंदविली. तक्रारीवरुन गोरेगाव पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुध्द भांदवीच्या कलम २९५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सुरेश नारनवरे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत त्वरित घटनास्थळी धाव घेतली. तसेच गिधाडी येथे चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या घटनेमुळे गिधाडीसह परिसरातील गावांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वीच याच तालुक्यातील तुमसर येथे सावित्रीबाई यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती.