डिजि लॉकरमधील ओळखपत्र ग्राह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:10 IST2018-07-25T00:09:31+5:302018-07-25T00:10:12+5:30
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सुविधांसाठी शासनाच्या डिजिटल लॉकरमध्ये अपलोड करण्यात आलेल्या आधारकार्ड व ड्रायव्हिंग लायसंसची साफ्ट कॉपी ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरत आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान ओळखपत्र नसल्यास प्रवाशांची आता फजिती होणार नाही.

डिजि लॉकरमधील ओळखपत्र ग्राह्य
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सुविधांसाठी शासनाच्या डिजिटल लॉकरमध्ये अपलोड करण्यात आलेल्या आधारकार्ड व ड्रायव्हिंग लायसंसची साफ्ट कॉपी ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरत आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान ओळखपत्र नसल्यास प्रवाशांची आता फजिती होणार नाही.
रेल्वेने प्रवाशांच्या डिजि लॉकरमध्ये उपलब्ध आधारकार्ड व ड्रायव्हिंग लायसंसच्या डिजिटल कॉपीला ओळखपत्राचा पुरावा (आयडी प्रुफ) म्हणून रेल्वे प्रशासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार जर प्रवाशाने आपल्या डिजि लॉकर अकाऊंटमध्ये ‘इश्युड सेक्शन’मध्ये अपलोड केलेले आधारकार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसंस दाखविले तर ते मान्य ओळखपत्र म्हणून स्वीकार करण्यात येत आहे.
अनेकदा अशी विषम परिस्थिती निर्माण होते की जेव्हा ‘ओरिजिनल आयडी प्रुफ’ दाखविण्याची गरज भासते. परंतु नेमक्या त्याचवेळी दाखविण्यासाठी आपल्याकडे काहीही नसते. अशा स्थितीतून वाचण्यासाठी ही सुविधा विशेष लाभदायक ठरणार आहे. अशाप्रकारे एखाद्याकडे प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारचे मूळ ओळखपत्र नसल्यास, डिजि लॉकरमध्ये उपलब्ध आधारकार्ड व ड्रायव्हिंग लायसंसची डिजिटल कॉपी ओळखपत्र म्हणून प्रवासी सादर करू शकतो.
आधारकार्ड व ड्रायव्हिंग लॉयसंसला प्रवासादरम्यान कोणत्याही व्यक्तीचे कायदेशीर ओळखपत्र मानले जाईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
जर प्रवासी आपल्या डिजि लॉकरच्या खात्यात लॉग-इन करून जारी दस्तावेज अनुभागातून आधारकार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसेंस दाखवेल तर त्या ओळखपत्राला वैध प्रमाणपत्र समजले जाणार आहे. परंतु प्रवासी जर स्वत:च्या द्वारे सॉफ्ट फार्ममध्ये जसे मोबाईल, मेल, लॅपटॉप आदींमध्ये अपलोड केलेले दस्तावेज ओळखपत्र म्हणून दाखवेल तर त्यावेळी त्यांना वैध प्रमाणपत्र म्हणून स्वीकार केले जाणार नाही, असेही रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
काय आहे डिजि लॉकर?
भारत सरकारने नागरिकांना क्लाऊड आधारित या प्लॅटफॉर्मवर आपले काही अत्यंत महत्वपूर्ण दस्तावेज सुरक्षित ठेवण्याची सुविधा दिली आहे. यालाच डिजि लॉकर म्हणतात. डिजिटल लॉकर सरकारकडून संचालित क्लॉऊड स्टोरेज सेवा आहे. जेथे लोक आपल्या निश्चित दस्तावेजांना सुरक्षित ठेवू शकतात. रेल्वेने आपल्या सर्व झोनल प्रिंसिपल चीफ कमर्शियल मॅनेजर यांना औपचारिक संदेश द्वारे डिजि लॉकरमधील आधार कार्ड व ड्रायव्हिंग लायसंस या दोन्ही दस्तावेजांना प्रवाशांचे मान्य ओळखपत्र म्हणून स्वीकार केले आहे.