लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मी चिल्लर नाही, ठोक आहे. कारण मी मागच्या दाराने निवडून येत नाही. मी सन्मानाने वागतो, बोलतो, त्यामुळे समोरच्यांनीही तसेच वागावे. अन्यथा खा. संजय राऊत यांच्यापेक्षा माझ्याकडे अधिक माहिती आहे, ती बाहेर काढण्यास भाग पाडू नका, असा इशारा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना दिला.
मंगळवारी (दि. १७ जून) गोंदिया येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामकाजावर तीव्र शब्दांत टीका करत ते म्हणाले, गेल्या १३ वर्षात जिल्हा बँकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. या बँकेच्या माध्यमातून गेल्या शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेच निर्णय घेण्यात आले नाही. सत्ताधाऱ्यांनी केवळ स्वतःचे हित साधले. जिल्हा बँक निवडणुकीत पराभवाची भीती वाटत असल्याने सत्ताधाऱ्यांनी घोडेबाजार तेज केला असल्याचा आरोपही पटोले यांनी केला. पत्रकार परिषदेला काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड, गप्पू गुप्ता व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
खा. प्रफुल्ल पटेल व आ. परिणय फुके यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत ते म्हणाले, मी मागच्या दाराने नव्हे तर जनतेतून निवडून जातो. नागपूरच्या पार्सलने विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात गल्लोगल्ली जाऊन माझ्या विरोधात प्रचार केला पण यानंतरही ते माझा पराभव करू शकले नाहीत. शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना कोण न्याय देऊ शकतो, हे जनतेला चांगलेच ठाऊक असल्याने जनता आमच्या पाठीशी आहे.