चारित्र्यावर संशय घेत पतीने केली पत्नीची हत्या, गोंदिया तालुक्यातील अंभोरा येथील घटना

By अंकुश गुंडावार | Updated: May 9, 2025 20:27 IST2025-05-09T20:27:07+5:302025-05-09T20:27:35+5:30

Gondia News: चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. ८) रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास गोंदिया तालुक्यातील रावणवाडी पोलिस ठाणेंतर्गत येणाऱ्या अंभोरा येथे घडली.

Husband kills wife over suspicion of character, incident in Ambhora, Gondia taluka | चारित्र्यावर संशय घेत पतीने केली पत्नीची हत्या, गोंदिया तालुक्यातील अंभोरा येथील घटना

चारित्र्यावर संशय घेत पतीने केली पत्नीची हत्या, गोंदिया तालुक्यातील अंभोरा येथील घटना

गोंदिया - चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. ८) रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास गोंदिया तालुक्यातील रावणवाडी पोलिस ठाणेंतर्गत येणाऱ्या अंभोरा येथे घडली. आरती सुनील पटले (वय ३०, रा. अंभोरा) असे या घटनेतील मृतक पत्नीचे नाव आहे, तर सुनील मदन पटले (३५, रा. अंभोरा) असे आरोपी पतीचे नाव आहे. रावणवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील आणि आरती यांचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. या दाम्पत्यांना एक दीड वर्षाचा मुलगा आहे. गेल्या पाच वर्षांपासून सुखाने नांदत असलेल्या सुनील आणि आरती यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून मागील सहा महिन्यांपासून वाद सुरू होता.

सुनील पटले हा वारंवार पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. ही बाब आरतीला खटकत होती. गेल्या काही दिवसांपासून यामुळे त्यांच्यात वारंवार वाद होत होते. गुरुवारी (दि. ८) रात्री उशिरा या दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. सुनीलने रागाच्या भरात कुऱ्हाडीने पत्नी आरतीवर हल्ला केला. या हल्ल्यात ती जागीच ठार झाली. या घटनेनंतर सुनीलने घटनास्थळावरून पळ काढला होता. यानंतर त्याने रावणवाडी पोलिसांसमोर आत्मसर्पण केले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर हत्या व अन्य आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक मंगेश पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक नवकार हे करीत आहेत.

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार लग्नानंतर सुनील आणि आरती या दोघांचा सुखी संसार सुरू होता. पण, सुनील हा आरतीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून वाद सुरू होता. गुरुवारी अशाच झालेल्या भांडणातून सुनीलने आरतीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली.
- वैभव पवार, पोलिस निरीक्षक रावणवाडी

गुरुवारी रात्रीच्या सुमारास पती-पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात सुनीलने घरात असलेल्या कुऱ्हाडीने पत्नी आरतीवर वार करून तिची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

Web Title: Husband kills wife over suspicion of character, incident in Ambhora, Gondia taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.