शंभरी गाठलेली नगर परिषद घनकचरा प्रकल्पाविनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 05:00 IST2020-08-07T05:00:00+5:302020-08-07T05:00:48+5:30
शहरात निघणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी नगर परिषदकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प असणे बंधनकारक आहे. या प्रकल्पातच कचऱ्याचे व्यवस्थापन होऊन शहर स्वच्छ ठेवता येते. मात्र आश्चर्य व धक्कादायक बाब म्हणजे सन १९२० मध्ये स्थापना असलेल्या गोंदिया नगर परिषदेकडे शंभरी गाठत असतानाही घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही.

शंभरी गाठलेली नगर परिषद घनकचरा प्रकल्पाविनाच
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सन १९२० स्थापना झालेली गोंदिया नगर परिषद आता शंभरी गाठत असतानाच आजही घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याची समस्या अद्यापही कायम आहे. विशेष म्हणजे, आजही नगर परिषदकडे प्रकल्पासाठी जागा नसून जागेसाठी धावपळ सुरू आहे. अशात मात्र शहरात निघणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगर परिषदेने शहरातील मोक्षधामालाच डम्पींग यार्ड बनविल्याचे चित्र आहे.
स्वच्छतेतून समृद्धीचा संदेश देत केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. अशात प्रत्येक नागरिकाने स्वच्छता राखणे गरजेचे असतानाच शहराची जबाबदारी असलेल्या नगर परिषदांनाही शहरात निघणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था करणे आवश्यक आहे.
शहरात निघणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी नगर परिषदकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प असणे बंधनकारक आहे. या प्रकल्पातच कचऱ्याचे व्यवस्थापन होऊन शहर स्वच्छ ठेवता येते. मात्र आश्चर्य व धक्कादायक बाब म्हणजे सन १९२० मध्ये स्थापना असलेल्या गोंदिया नगर परिषदेकडे शंभरी गाठत असतानाही घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही.
एवढेच काय तर अद्याप प्रकल्पासाठी जागाही मिळालेली नाही. अशा स्थितीत मात्र शहरात दररोज निघणाऱ्या सुमारे ५२ टन कचऱ्याची विल्हेवाट येथील मोक्षधाम परिसरात कचरा टाकून लावली जात आहे. नगर परिषदेने प्रकल्प नसल्याने येथील मोक्षधामालाच डम्पींग यार्ड बनवून टाकले आहे. यामुळे मात्र शहरवासीयांना विषारी वातावरणातच श्वास घ्यावा लागत आहे. विशेष म्हणजे, ही परिस्थिती असतानाही नगर परिषद प्रशासनाला याबाबत गांभीर्य नसल्याचे दिसते.
नगर परिषद टास्क फोर्सच्या टार्गेटवर
जिल्ह्यात तयार झालेल्या नगर पंचायती आता आपले प्रकल्प उभारत असताना गोंदिया नगर परिषदेकडे प्रकल्प नसणे ही खेदाची बाब आहे. ही बाब लक्षात घेत जिल्हा टास्क फोर्सने नगर परिषदेला जानेवारी महिन्यात नोटीस बजावले होते. त्यात नगर परिषदेला ठराविक मुदत देत अन्यथा नगर परिषदेचे खाते सील करण्याचा इशाराही दिला होता.मात्र मधातच कोरोनाचा प्रादुर्भाव आल्याने टास्क फोर्स सध्या वाट बघत आहे. मात्र नगर परिषद टास्क फोर्सच्या टार्गेटवर आहे हे नक्की.
जागेसाठी गावांचा नकार
नगर परिषदेने सर्वप्रथम प्रकल्पासाठी टेमनी येते जागा बघितली होती. मात्र गावकऱ्यांच्या विरोधानंतर ती जागा सोडावी लागली. त्यानंतर कित्येक जागा बघितल्यानंतर काही ना काही आडकाठी आली. मध्यंतरी नगर परिषदेने ग्राम रतनारा व कारंजा येथे जागा बघितली होती. मात्र ग्रामसभेत जागेसाठी नकार देण्यात आला व विषय तेथेच संपला. त्यानंतर आता ग्राम सोनपुरी येथील जागा नगर परिषदेने बघितली होती व त्यासाठी सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र गावकºयांनी जागा देण्यास विरोध दर्शविला आहे. अशात आता जागेसाठी पुन्हा नगर परिषदेला शोध मोहीम सुरू करावी लागणार आहे.