शिकणार कसे अ, आ, ई ?
By Admin | Updated: May 31, 2014 23:33 IST2014-05-31T23:33:20+5:302014-05-31T23:33:20+5:30
एकेकाळी मध्यप्रदेशचा भाग असलेल्या, छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यांना लागून असलेल्या गोंदिया जिल्ह्यात हिंदी भाषा व संस्कृतीचा प्रभाव आजही आहे. येथे दोन मराठी माणसे बाहेर भेटल्यावर आपसात

शिकणार कसे अ, आ, ई ?
नरेश रहिले - गोंदिया
एकेकाळी मध्यप्रदेशचा भाग असलेल्या, छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यांना लागून असलेल्या गोंदिया जिल्ह्यात हिंदी भाषा व संस्कृतीचा प्रभाव आजही आहे. येथे दोन मराठी माणसे बाहेर भेटल्यावर आपसात हिंदीतच बोलतात. त्यामुळे मराठीची दुरवस्था आहे. राज्यघटनेप्रमाणे कुणी कुठल्याही भाषेत शिक्षण घेऊ शकतो. मातृभाषेची सक्ती शिक्षणासाठी करू शकत नाही, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्रात मराठीची सक्ती करता येणार नाही. आता इंग्रजीचे पीक आल्यामुळे मुले अ,आ, ई कसे शिकणार? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
भाषा हा मुद्दा भारतातील सर्व प्रदेशांचा आहे
कुठल्याही भाषेची सक्ती घटनेप्रमाणे करता येत नाही. सध्याचा काळ बदलत चालला आहे. हा केवळ मराठीचाच मुद्दा नाही तर सर्व भारतीय भाषांचा मुद्दा आहे. या भाषेच्या निर्णयाला दोन बाजू आहेत. काही बाबी चांगल्या असल्या तरी त्याची दुसरीही बाजू आहे. मराठीतून शिक्षण घेतल्याने नोकर्या मिळत नाही. त्यामुळे आपला भाषेविषयीचा अभिमान वृथा ठरणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. बदलत्या काळात जागतिक भाषेतच व्यवहार होणार, पण मातृभाषा आली पाहिजे, यासाठी पालकांचा संस्कार महत्त्वाचा आहे. प्रत्येक राज्य आपल्या राज्यातील भाषा रूजविण्याचा प्रयत्न करते.
क्प्रा. ओ.सी. पटले, जेष्ट साहित्यिक, आमगाव.
आपल्या भाषेचा अभिमान असावा
कोणत्याही प्रांतातील व्यक्तीला आपली मातृभाषा सर्वात समृध्द वाटते. कुठलीही प्रादेशिक भाषा वा मातृभाषा भाषिक अल्पसंख्यकांवर कोणतेही राज्य लादू शकत नाही. या निकालाबद्दल उच्च न्यायालयाचे धन्यवाद मानले पाहिजेत. हा निकाल संविधानातील भाषिक धोरणाचा सन्मान करणारा आहे. भाषिक सूडबुद्धीवर नियंत्रण आणणारा हा निर्णय आहे. प्रत्येकाला कुठल्याही भाषेतून शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. या निर्णयाने नागरिकांच्या स्वातंत्र्याचेच रक्षण करण्यात आले आहे. परंतु मराठी माणसाला मराठीचा अभिमान असायला पाहिजे.
क्पूजा हेमने, विद्यार्थिनी, गोंदिया
नवीन भाषेचे शब्द स्वीकारायला हवे
मराठी भाषेचा प्रभाव कमी होत आहे, या बाबीशी मी सहमत नाही. गोंदिया जिल्हा हिंदी भाषिक राज्याला लागून असल्यामुळे येथील लोक बोलताना हिंदीचाही वापर करतात. आपण मराठी बरोबर इतर भाषांचाही स्वीकार करायला हवा. आपण दुसर्या भाषेतील काही शब्द मराठीत वापरले तर मराठी भाषा आणखी समृध्द होईल. झाडीपट्टी, वर्हाडी, अहिराणी, कोकणी या भाषांनी मराठीला समृध्द केले. इतर भाषांतील काही शब्द मराठीत वापरले गेले तर मराठी आणखी समृध्द होईल. मराठी समृध्द असल्याने तिला मरण नाही. गोंदियातील लोकांमध्ये मराठी बोलताना हिंदीचे शब्द येतात ते आपण स्विकारले पाहिजे. महाराष्ट्रीत माधव ज्युलीयन या कवीने आपल्या काव्यात अरबी व उर्दू भाषेचा वापर केला आहे. आपण मराठीत इतरही भाषा स्विकारायला हव्या.
क्माणिक गेडाम, ज्येष्ठ सदस्य, विदर्भ साहित्य संघ
शहरातून बाद होताहेत मराठी शाळा
गोंदिया शहरात नगर परिषदेच्या १८ प्राथमिक शाळा आहेत. त्यात १0 मराठीच्या तर आठ हिंदी माध्यामाच्या शाळा आहेत. याशिवाय हायस्कूल स्तरावर चार शाळा आहेत. या हायस्कूलमध्ये प्रत्येक शाळेत एक वर्ग मराठी तर एक हिंदीचा आहे. नगर परिषदेने शहरातील मराठी शाळेकडे दुर्लक्ष केल्यामुळे काही मराठी शाळा बंद झाल्या आहेत. तर काही शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. नगर परिषदेने मराठी शाळांच्या विकासाठी पाहिजे तशा उपाययोजना केल्या नाहीत. वाढत्या स्पर्धेमुळे पालकवर्गही मराठीकडे दुर्लक्ष करीत आहे. आपल्या पाल्यांना इंग्रजीचे शिक्षण देणार्या शाळांमध्ये दाखल करवून घेतात. यामुळे मराठी शाळा बंद होतानाचे चित्र दिसत आहे.