नाव नोंदणीच्या नावावर घरकामगारांची पिळवणूक
By Admin | Updated: December 27, 2014 01:57 IST2014-12-27T01:57:10+5:302014-12-27T01:57:10+5:30
घरेलू कामगार महिलांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाने त्यांची नोंदणी कामगार कार्यालयात करण्यास सांगितले.

नाव नोंदणीच्या नावावर घरकामगारांची पिळवणूक
गोंदिया : घरेलू कामगार महिलांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाने त्यांची नोंदणी कामगार कार्यालयात करण्यास सांगितले. त्यामुळे ही नोंदणी करण्यासाठी अर्ज महिलांनी गोंदियाच्या कामगार उपायुक्तांच्या कार्यालयात धाव सुरू आहे. मात्र तिथेही दलाल सक्रिय झाले आहे. नाव नोंदणीसाठी केवळ ९० रूपये शुल्क पडत असताना त्या महिलांकडून तब्बल ४०० रूपये घेऊन दलालीला हा गोरखधंदा सर्रास सुरू आहे.
मागील अनेक वर्षापासून घरेलू कामगार महिला आपल्या विविध मागण्यांना घेऊन मोर्र्चे, आंदोलने करीत होत्या. त्यामुळे त्यांना विविध योजनेचा लाभ देण्यासाठी घरेलु कामगार महिलांना कामगार कार्यालयात आपले नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा कामगार आयुक्त कार्यालयातर्फे घरेलु कामगारांना अर्ज मागविले. आठवड्यातील एक दिवस शुक्रवार हा नाव नोंदणीचा दिवस ठरल्याने जिल्ह्यातील घरेलू कामगार महिलांना बोलावले जाते. त्यासाठी मागील अनेक दिवसापासून कामगार आयुक्त कार्यालयात महिला दाखल होतात. त्यासाठी त्यांना आधारकॉर्ड, मतदान कार्ड, जन्माचा दाखला, तीन रंगीत फोटो, राष्ट्रीयकृत बँकेचे खाते क्रमांक, रेशन कार्ड व ज्या व्यक्तीकडे ती महिला घरेलु काम करते त्या मालकाचा ती काम करीत असल्याचा दाखला घेऊन महिलांना बोलावण्यात आले.
शेकडो महिला या ठिकाणी नोंदणीसाठी येतात. परंतु त्या महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेत या परिसरात सक्रिय असलेले दलाल त्या महिलांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत. नाव नोंदणीसाठी ९० रूपये लागतात. मात्र दलाल त्या महिलांकडून ४०० रूपये वसूल करीत आहेत. त्यांचे कार्यालयीन कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांशी साटेलोटे असण्याची शंकाही या महिलांनी व्यक्त केली. या प्रकाराकडे संबधित विभागाने लक्ष देण्याची मागणी आहे. आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यातील ४५२७ घरेलु कामगार महिलांनी आपल्या नावाची नोंदणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)