सकाळी होळीदहन आणि दुपारी धुळवड
By Admin | Updated: March 26, 2016 01:46 IST2016-03-26T01:46:16+5:302016-03-26T01:46:16+5:30
यंदाच्या होळी दहन २२ मार्चला की २३ मार्चला याचा संभ्रम शेवटपर्यंत राहिला. सालेकसा तालुक्यात काही गावात ...

सकाळी होळीदहन आणि दुपारी धुळवड
कुठे एक दिवस तर कुठे तीन दिवस : एकाच दिवशी दोन्ही उत्सव
सालेकसा : यंदाच्या होळी दहन २२ मार्चला की २३ मार्चला याचा संभ्रम शेवटपर्यंत राहिला. सालेकसा तालुक्यात काही गावात २२ ला होळी आणि २३ ला धुळवड साजरी केली. तर काही गावांनी २३ मार्चला सकाळी होळी दहन आणि दुपारी रंगोत्सवाची धुळवड उडविली. तर काही गावांमध्ये २३ मार्चला होळीदहन आणि २४ मार्चला धुळवड साजरी करण्यात आली. त्यामुळे सालेकसा तालुक्यात मिश्र संस्कृतीचा प्रभाव असल्याने यंदा होळीचे रंग वेगळे व बहुरंगी झाल्याचे दृश्य दिसून येत आहेत. परंतु या विषमतेमुळे कामकाज व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना अस्वस्थ होण्याचीसुद्धा पाळी आली.
सालेकसा तालुका हा तीन राज्याच्या टोकावर असल्याने या तालुक्यावर महाराष्ट्रसह मध्यप्रदेश आणि छत्तीसगड संस्कृतीचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो. याचा परिणाम सण, उत्सव साजरा करण्यावर ही पडत असतो. त्यामुळे अनेक बाबतीत विषमता नेहमीच दिसून होते.
मराठी कॅलेंडरनुसार यंदा होळी दहन २३ मार्चला आणि २४ मार्चला धुलीवंदन साजरा करण्याची तिथी कॅलेंडरमध्ये दिलेली आहे. परंतु मध्यप्रदेश, छत्तीसगडसह संपूर्ण उत्तर भारतात हिंदी भाषिक राज्यात २२ मार्चलाच होळी दहनची तिथी कॅलेंडरमध्ये दिलेली आहे. सालेकसा तालुक्याच्या उत्तरेकडील भागात अनेक गावे मध्यप्रदेशच्या सीमेलगत असल्याने या गावांमध्ये मराठीपेक्षा हिंदीचा जास्त प्रभाव आहे. तसेच छत्तीसगड सिमेलगत छत्तीसगडी आणि हिंदीचा प्रभाव असून या क्षेत्रात छत्तीसगडी व मध्यप्रदेशचे सण उत्सव साजरे होतात. भाषा ही त्यांचीच बोलतात. त्यांना मराठी अवघड वाटते म्हणून अनेक लोक मराठी पेक्षा हिंदीचा जास्त महत्व देतात. दुसरी बाजू असी की हिंदी भाषिक परिसरातील लोकांची सोयरकी मध्यप्रदेशच्या लोकांशी जास्त आहे. त्यामुळे या परिसरात सण उत्सवाच्या समन्वय हिंदी कॅलेंडरनुसार चालते. याचा परिणाम असा झाला की यंदा सालेकसा तालुक्यात झालीया, कोटजमुरा, सोनपुरी, पिपरीया आदी गावात २२ मार्चला सायंकाळी होळी दहन आणि २३ ला रंगोत्सव साजरा करण्यात आला. मध्यभागात काही गावात हिंदी, मराठी दोन्ही प्रकारचे लोक वास्तव्यास असल्याने काही ठिकाणी एकाच गावात एकीकडे २२ ला तर दुसऱ्या भागात २३ ला होळी दहन करण्यात आले. काही गावात २३ लाच सकाळी होळीदहन आणि त्याच दिवशी दुपारी रंगोत्सव साजरा करण्यात आला. मराठी भाषीक गावांमध्ये २३ मार्चला होळी दहन आणि २४ मार्चला धुळवड साजरी झाली आहे. त्यामुळे सालेकसा तालुक्यात यंदा तीन दिवस होळी उत्सव साजरा करण्यात आला.
होळीचा उत्सव फागून महिन्याच्या पौर्णिमेला साजरा होतो. यंदा पौर्णिमेचा काळ २३ लाख दुपारी ५.३० वाजतापर्यंत असल्याने हिंदी भाषिकांनी चतुर्दशी पौर्णिमेलाच होळी दहन करण्याचे ठरविले. परंतु मराठी कॅलेंडरनुसार फाल्गुन पौर्णिमा २३ ला होळी दहन दाखविण्यात आला आहे. २३ ला छाया कल्प चंद्रग्रहण असून तो सायंकाळी ७.२५ पर्यंत राहणार असल्याचे कॅलेंडरमध्ये आहे. त्यामुळे अनेक संभ्रम निर्माण झाला. परंतु हे चंद्रग्रहण नुकसान कारक नसून धार्मिक उत्सव साजरा करण्यात अडचण नसते. असे मत काही ज्योतिषाचे असल्याने यंदा होळी दहन एकच दिवशी आली नाही. (तालुका प्रतिनिधी)