गोंदियातील ईदला भेटणार हिंदूृ-मुस्लिम

By Admin | Updated: July 18, 2015 01:14 IST2015-07-18T01:14:16+5:302015-07-18T01:14:16+5:30

शहरात सर्वत्र रमजान ईदची धूम दिसून येत आहे. मुस्लिम बांधवांची सेवई खरेदीसाठी दुकानांत एकच गर्दी आहे.

Hindus and Muslims meet Eid in Gondia | गोंदियातील ईदला भेटणार हिंदूृ-मुस्लिम

गोंदियातील ईदला भेटणार हिंदूृ-मुस्लिम

शिरखुरमासाठी सज्ज : सामाजिक सलोख्याची परंपरा
लोकमत विशेष
गोंदिया : शहरात सर्वत्र रमजान ईदची धूम दिसून येत आहे. मुस्लिम बांधवांची सेवई खरेदीसाठी दुकानांत एकच गर्दी आहे. मुस्लीम धर्मातील सर्वात पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान ईदसाठी मुस्लिम बांधवांची ही धडपड सुरू असताना अनेक हिंदू समाजबांधवही ईदच्या शिरखुरम्याची लज्जत चाखण्यासाठी सज्ज झाले आहेत. गोंदियात ईदच्या या सणाला हिंदू-मुस्लिमांच्या सामाजिक सलोख्याची परंपरा वर्षानुवर्षांपासून सुरू आहे.
रमजानचा अर्थ व महत्व
साक्षात अल्लाहचा महिना म्हणून रमजानची ओळख आहे. मोहम्मद पैगंबर मक्काशरीफ येथील एका पहाडाच्या गुहेमध्ये (गार ए हिरा) बसून एक महिना पूजन करीत होते. तेव्हापासून याला रमजान म्हटले जात असून त्यांना माननारे रमजान साजरी करतात. तसेच रहमान प्रमाणेच रमजान हे अल्लाह चे नाव असल्याने रमजानला अल्लाहचा महिना म्हटले जाते. त्यामुळेच मुस्लीम धर्मात सर्वात पाक (पवीत्र) महिना म्हणून रमजान मानला जातो. ३० दिवस कालावधींचा असून इस्लामी वर्षाचा हा नववा महिना आहे. साक्षात अल्लाहचा महिना रमजानला म्हणण्यात आले असल्याने मुस्लीम धर्मात याला अत्यंत पवित्र मानले गेले आहे. मुस्लीम धर्मात चार स्तंभ आहेत. त्यात नमाज (पूजा), रोजा (उपवास), जकात (कर) व हज (यात्रा) यांचा समावेश आहे. या रमजान महिन्यात रोजा (उपवास) केले जात असून रमजान महिन्यात अल्लाहकडून ‘कुराण’ या जमिनीवर आले होते. त्यामुळे या महिन्यात पूजापाठ केली जाते.
विशेष म्हणजे या महिन्यातील एक रात्र आहे तिला ‘शबे कदर’ म्हटले जाते. या रात्रीची केलेली पूजा म्हणजे एक हजार महिन्यांच्या रात्रीच्या पूजेच्या बरोबर मानली जाते. त्यामुळे त्या रात्रीला विशेष महत्व असून या रात्रीला पुरूष मस्जीदमध्ये तर महिला आपल्या घरीच पूजापाठ करतात. तर रमजान महिन्याच्या शेवटच्या १० दिवसांना ‘ऐतेफाक’ म्हटले जात असून यात समाजातील कमीत कमी एक व्यक्ती १० दिवस बाहेरील संपर्क सोडून मस्जीदमध्ये राहते. कुणाशी न बोलता ते फक्त अल्लाहची पूजा करीत असल्याचे खतीबो इमाम गौसीया रजविया मस्जीदचे मौलाना मोहम्मद कासीम रजा यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)
चंद्रदर्शनानंतरच होणार ईद साजरी
कॅलेंडरमध्ये शनिवारची (दि.१८) रमजान ईद दर्शविण्यात आली आहे. मात्र चांद (चंद्र) दिसल्यावरच ईद साजरी होणार असल्याचे मौलाना मो. रजा यांनी सांगितले. यासाठी जिल्हास्तरावर चांद कमिटी असते. या कमिटीतील दोन सदस्य अगोदरच नागपूरला गेले आहेत. तर लगतच्या राज्यातील काही जिल्ह्यातील कमिटीचे सदस्य गोंदियात आले आहेत. ज्या ठिकाणी चांद दिसतो, तेथील मौलाना तेथे प्रमाणपत्र तयार करून देतात व ते प्रमाणपत्र ठिकठिकाणहून आलेल्या चांद कमिटीच्या सदस्यांना आपल्या गावी घेऊन जाणे व तेथील मौलाना व कमिटी अध्यक्षांना दाखविणे बंधनकारक आहे. कमिटीतील त्या व्यक्तीला समोर बघितल्यानंतरच अजान करू न सर्वांना जाहीरपणे चांद दिसल्याचे कळविले जात असल्याचेही मौलाना मो. रजा यांनी सांगितले.
‘रोजा’ म्हणजे काय ?
रमजानमध्ये मुस्लीम बांधव ठेवत असलेल्या उपवासाला ‘रोजा’ म्हणतात. यात सकाळी ३.३० वाजता उठून हल्के भोजन केले जाते, त्याला ‘सहरी’ म्हणतात. त्यानंतर पूर्ण दिवस काहीच खान-पान केले जात नाही. विशेष म्हणजे वाईट बोलणे, वाईट बघणेच काय यात थूंक सुद्धा गिळले जात नाही. सुर्यास्ताची अजान झाल्यानंतर भोजन ‘ईफ्तारी’ करून हा रोजा सोडला जातो.
सेवई व खजूरचे महत्त्व
महिनाभर केलेल्या पूजेच्या मोबदल्यात अल्लाह आनंद साजरा करण्याची संधी देतात व त्यालाच रमजान ईद म्हटले जाते. यात ईदची नमाज अदा करण्यासाठी घरून निघतात तोंड गोड करून निघावे लागते. तेव्हा सेवई व खजूर खायची परंपरा आहे. त्यामुळेच रमजान ईदमध्ये सेवई व खजूरचे विशेष महत्व आहे.

Web Title: Hindus and Muslims meet Eid in Gondia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.