३१ मे रोजी सर्वाधिक तापमानाची नोंद
By Admin | Updated: June 4, 2014 23:50 IST2014-06-04T23:50:53+5:302014-06-04T23:50:53+5:30
विदर्भात उष्णतेच्या लाटेने जनजीवन प्रभावीत झाले असताना यावर्षी गोंदियात सुद्धा पारा जास्तच वर चढत आहे. यावर्षी शनिवारी ३१ मे रोजी तापमान तब्बल ४५.१ अंश सेल्सिअस असल्याची नोंद सरकारी यंत्रणेने घेतली.

३१ मे रोजी सर्वाधिक तापमानाची नोंद
गोंदिया : विदर्भात उष्णतेच्या लाटेने जनजीवन प्रभावीत झाले असताना यावर्षी गोंदियात सुद्धा पारा जास्तच वर चढत आहे. यावर्षी शनिवारी ३१ मे रोजी तापमान तब्बल ४५.१ अंश सेल्सिअस असल्याची नोंद सरकारी यंत्रणेने घेतली. या तापमानामुळे घराबाहेर पडणे कठीण झाल्याने शहरासह ग्रामीण भागात अघोषित संचारबंदी असल्यासारखे चित्र निर्माण होत आहे.
उन्हाळ्य़ाच्या सुरूवातीला पाऊस व गारपीटीने काही दिवस गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे उन्हाळ्य़ाच्या खर्या चटक्यांची चव लागायची होती. त्यानंतर मात्र एप्रिलच्या सुरूवातीच्या पंधरवड्यानंतर उन्हाळा आपल्या रंगात आला. तर मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली. यावर्षीचे सर्वाधिक तापमान ४५.१ अं.से. पेक्षा जास्त नोंदविण्यात आले. यामुळे उष्णतेच्या लाटेने जनजीवनावर तीव्र परिणाम झाला. दुपारी १२ वाजतानंतर घराबाहेर पडणे नागरिकांनी बंद केले आहे. शहरातील रस्ते व बाजारपेठ १२ ते ५ या वेळेत सामसूम असते. एकंदरीत शहरात अघोषित संचारबंदी असते. गेल्या आठ दिवसांपासून सतत गोंदियाचे तापमान ४३ अंशांपेक्षा जास्त राहत असल्यामुळे दुपारी १२ वाजतानंतर कोणीच घराबाहेर पडताना दिसत नाही.
उष्णतेचा हा कहर सुरू असतानाच नवतपा चांगलाच तापला. नवतपाच ३१ मे रोजी सर्वाधीक ४५.१ अं.से.तापमानाची नोंद घेण्यात आली. उष्णतेच्या या लाटेने गोंदिया चांगलाच तापत असून अशात कुलर सुद्धा काम करीत नसल्याचे नागरिक बोलू लागले आहेत.
उष्णतेचा कोप सुरू असतानाच त्यात वेळी अवेळी होत असलेले भारनियमन जखमेवर मिठाचे काम करीत आहे. उकाड्याने अंगाची लाही-लाही होत असल्याने नागरिक बाहेर निघणे टाळत आहेत. तर भारनियमनामुळे घरात जीव गुदमरू लागला असून नागरिकांसाठी इकडे-आड व तिडके विहीर अशी स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.
सुर्याच्या कोपामुळे कार्यालयीन कर्मचारी व व्यावसायिक सुद्धा दुपारच्या वेळी घरी जाण्याचे टाळत आहेत. मजुरांना बाहेर पडणे अनिवार्य असल्याने तीव्र उष्णतेपासून बचाव करण्यासाठी स्कार्फ व उष्णतारोधक कापडांचा वापर करीत आहेत. वाढत्या उकाड्यात गारवा मिळण्यासाठी शहरातील विविध चौकात व सार्वजनिक ठिकाणी शीतपेयाची दुकाने लागली आहेत.
तर कामानिमित्त घराबाहेर पडलेल्यांना गळा कोरडा पडल्यास पोणपोई सोयीची ठरत आहे. शेतकरी बांधव सुद्धा उन्हाच्या चटक्यांपासून बचाव करण्यासाठी पहाटेलाच उठून शेतातील कामे ११ वाजतापूर्वी पूर्ण करीत आहेत. वाढत्या तापमानाचा फटका व्यावसायिकांना देखील बसला आहे. दुपारनंतर बाजारपेठ ग्राहकाविना ओस पडलेली असते. वाढत्या उन्हामुळे ग्रामीण व शहरी भागातील रस्ते पूर्णत सामसूम दिसत आहेत. (शहर प्रतिनिधी)