मुलीच्या सुखासाठी तिच्या सवतीचा खून

By Admin | Updated: July 14, 2014 01:06 IST2014-07-14T01:06:13+5:302014-07-14T01:06:13+5:30

चारित्र्याचा संशय माणसाला रसातळाला पोहचवितो.

Her mother's blood for daughter's sake | मुलीच्या सुखासाठी तिच्या सवतीचा खून

मुलीच्या सुखासाठी तिच्या सवतीचा खून

चारित्र्याच्या संशयावरुन केला गर्भवतीचा खून : १५ दिवसात गुन्हा उघडकीस आणला
गोंदिया :
चारित्र्याचा संशय माणसाला रसातळाला पोहचवितो. संशयाची सुई एखाद्याच्या मनात आली तर तो व्यक्ती खऱ्या व्यक्तीवरही खोटाचं बोलत असल्याचा आरोप करतो. या संशयाच्या भोवऱ्यात पती-पत्नी असले तर त्यांचा संसार दुभंगल्याशिवाय राहत नाही. अश्याच एका पतीने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन तिच्या पोटात असलेले बाळ आपले नाही, असा ठाम निश्चय केला. अनैतिक संबंधातून जन्माला येणाऱ्या बाळाला आपले नाव देणार नाही. त्यासाठी त्या बाळाला जन्माला येऊच देणार नाही असा चंग त्याने बांधला. मध्यप्रदेशच्या बालाघाट बावनथडी कॉलनी वॉर्ड नं.२३ येथील रहिवासी रविशंकर बेनिराम चचाने (२८) याला दोन पत्नी आहेत. पहिली पत्नी गोंदियाच्या गोंविंदनगरातील तर दुसरी पत्नीलाच त्याने ठार केले.
१५ जून २०१४ रोजी रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बिरसोला रेल्वेस्थानकापासून अर्धा किमी. अंतरावर रेल्वेरूळाच्या बाजूला एक गर्भवती महिला मृतावस्थेत आढळली. याची माहिती रावणवाडी पोलिसांना मिळाल्यावर पोलीस निरीक्षक निंबाळकर व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून त्या मृतदेहाचा पंचनामा केला. तो मृतदेह संशयास्पद स्थितीत होता. यासाठी पोलिसांनी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी तो मृतदेह ठेवला. रावणवाडी पोलिसांनी या संदर्भात भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, मध्यप्रदेशच्या बालाघाट, किरणापूर, हट्टा, नवेगाव लांजी पोलिसांना या घटनेची सूचना देऊन तिची ओळख पटविण्यासाठी रावणवाडी पोलीस रात्रंदिवस मेहनत करीत होते. काटी येथील मोबाईल टावर वरून या घटनेचा सुगावा घेण्यात आला. अखेर त्या मृतमहिलेची ओळख पटविण्यात रावणवाडी पोलीस १५ दिवसांत यशस्वी झाले. मृत असलेली ती महिला रोशनी रविशंकर चचाने (२५) असल्याचे पोलिसांना कळले. त्यानंतर त्या घटनेच्या मुळावर जातांना पोलिसांनी या प्रकरणात तिच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. आरोपी रविशंकर बेनिराम चचाने (२८) याची पहिली पत्नी कविता रविशंकर चचाने ही सन २००४ ते २०१२ या दरम्यान आपल्या पतीपासून वेगळी राहत होती.
त्या दरम्यान रविशंकरचा रोशनीसोबत संबध आला व त्याने तिला पत्नी म्हणून स्वीकार केले. परंतु त्यानंतर त्याची पहिली पत्नीही घरी आली. त्या दोघी सवतींमध्ये वारंवार वाद होत असत. त्यामुळे रोशनी वाद झाला की बाहेर जाऊन राहायची. यातूनच रविशंकरच्या मनात तिच्या चारित्र्याविषयी संशय निर्माण झाला. रोशनीला झालेली गर्भधारणा आपल्यापासून नाही, असे रविशंकरला वाटल्याने त्याने तिला ठार करण्याची योजना आखली. १४ जून रोजी गोंदिया तालुक्याच्या काटी येथे लग्नाला जाण्याचे कारण सांगून रविशंकरने रोशनीला काटी रेल्वेस्थानकावर आणले.
सायंकाळ होताच त्याने आपल्या सासऱ्याला (पहिल्या पत्नीचे वडील) आसाराम शाहू टांगसे (५५) रा. गोविंदपूर गोंदिया यांना बोलाविले. बिरसोला येथून अर्धा किमी. अंतरावर नेऊन त्या दोघांनी केबलने गळा आवळून गर्भवती असलेल्या रोशनीचा खून केला. या प्रकरणात रविशंकरला २९ जून रोजी तर आसाराम टांगसे याला ३० जून रोजी अटक करण्यात आली.
पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून करण्याचे ठरविले होते. तर आपल्या मुलीच्या जीवनाचा मार्ग सुखकर होईल या उद्देशातून सवतीच्या वडीलाने तिचा खून केला.
पतीच्या चारित्र्याच्या संशयाने एका सोबत दोन जीवांना यमसदनी पाठविणारे ते दोघे आता तुरूंगात आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Her mother's blood for daughter's sake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.