शेतकऱ्यांना मिळणार मदत
By Admin | Updated: March 8, 2015 01:15 IST2015-03-08T01:15:10+5:302015-03-08T01:15:10+5:30
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची नोंद कृषी विभागाने योग्य पद्धतीने घ्यावी. नुकसान कमी असो वा जास्त असो,

शेतकऱ्यांना मिळणार मदत
गोंदिया : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची नोंद कृषी विभागाने योग्य पद्धतीने घ्यावी. नुकसान कमी असो वा जास्त असो, फळपिकांचे असो अथवा भाजीपाला पिकाचे असो, झालेल्या नुकसानाची नोंद घेऊन एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी अधिकाऱ्यांना दिले. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात गुरुवारी बैठक घेऊन आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) एन.के. लोणकर, सहायक आदिवासी आयुक्त सुरेश पेंदाम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी उपस्थित होते.
बैठकीमध्ये पालकमंत्र्यांनी सडक अर्जुनी येथे अंदाजे १०० हेक्टरवरील झालेल्या नुकसानीबाबत माहिती घेतली. तिरोडा व अर्जुनी मोरगावला पावसाचे जास्त प्रमाण असल्यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची नोंद कृषी अधिकारी, तहसीलदार यांनी प्रामुख्याने घ्यावी असे सांगितले. या कालावधीत जिल्ह्यात सरासरी १०० मि.मी. पाऊस पडला असून सर्व तालुक्यातील जवस, गहू, लाखोरी, ऊस, ज्वारी या पिकांचे लागवडीखालील क्षेत्र व त्या प्रमाणात झालेल्या नुकसानाचे प्रमाण याबाबत माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी सैनी यांनी आपली सादरीकरणाद्वारे प्रत्येक तालुक्यातील पीक लागवडीखालील क्षेत्र, पावसाचे प्रमाण, जीवित व वित्तहानी याबाबत माहिती दिली. सालेकसा तालुक्यातील पाहणी व नुकसानग्रस्त भागाची नोंद त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)