Gondia | अर्जुनी मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी; इटियाडोह धरणाच्या कालव्यावरून सखल भागात पाणी

By अंकुश गुंडावार | Published: September 12, 2022 02:01 PM2022-09-12T14:01:23+5:302022-09-12T14:02:13+5:30

इटियाडोह धरणाच्या बरडटोली नजीकच्या कालव्यावरील पुलाखाली वास्तव्यास असलेल्या हजारो पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.

Heavy rains in Arjuni Morgaon taluka of gondia; Water from the Etiadoh Dam canal to the low lying areas | Gondia | अर्जुनी मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी; इटियाडोह धरणाच्या कालव्यावरून सखल भागात पाणी

Gondia | अर्जुनी मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी; इटियाडोह धरणाच्या कालव्यावरून सखल भागात पाणी

Next

अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : सोमवारी रात्री तालुक्यात दमदार पर्जन्यवृष्टी झाली. इटियाडोह धरणाच्या कालव्यावरून पाणी वाहून जात असल्याने अर्जुनीच्या माता माऊली मंदिर परिसरात पाणीच पाणी होते. अतिवृष्टीमुळे अनेक नाल्यांना पूर असल्याने व शाळांच्या पटांगणात पाणी साचल्याने सोमवारी अर्जुनी मोरगाव नगरीतील शाळांना सुट्टी देण्यात आली. इटियाडोह धरणाच्या बरडटोली नजीकच्या कालव्यावरील पुलाखाली वास्तव्यास असलेल्या हजारो पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.

अर्जुनी मोरगाव तालुक्यात सोमवारी रात्रीच्या सुमारास अतिवृष्टी झाली. मोरगाव, ताडगाव रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी होते. निलज नजीकच्या नाल्यावरून पाणी वाहत होते. सिरोली गावात इटियाडोह धरणाच्या कालव्यातून पाणी शिरल्याने गावात पाणीच पाणी दिसून येत होते. इटियाडोह धरण शंभर टक्के भरलेले आहे. भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील शेतीला सिंचन व्हावे या दृष्टिकोनातून कालव्यातून पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात आले होते. सोमवारी रात्री अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे जंगलातील पाणी कालव्यात उतरले. यामुळे धरणातून सोडलेल्या पाण्यात भर पडली व पाणी कालव्यावरून वाहू लागल्याने अनेक भागात पाणी साचले.

अर्जुनी मोरगाव नगरपंचायतचे नगरसेवक राधेश्याम भेंडारकर यांनी पाटबंधारे विभागाचे  अधिकारी व कर्मचाऱ्यांना धरणातून कालव्यात सोडलेले पाणी बंद करण्याची सूचना केली. सोमवारी धरणातून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले. सोमवारी सकाळपासून पाऊसाची रिपरिप सुरूच आहे. त्यामुळे तालुक्यातील आणखी काही नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. बरडटोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणात गुडघाभर पाणी साचलेले आहे. अर्जुनी मोरगावच्या बरडटोली परिसरातील काही घरात पाणी शिरल्याचे सांगण्यात येते. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास नुकसान होण्याची शंका व्यक्त केली जात आहे.

Web Title: Heavy rains in Arjuni Morgaon taluka of gondia; Water from the Etiadoh Dam canal to the low lying areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.