खाद्य पदार्थांमुळे आरोग्य धोक्यात
By Admin | Updated: March 6, 2015 01:38 IST2015-03-06T01:38:41+5:302015-03-06T01:38:41+5:30
ग्रामीण भागातील बहुतांश हॉटेल, रेस्टॉरेट व्यवसायिक नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ ग्राहकांच्या माथी मारत आहेत.

खाद्य पदार्थांमुळे आरोग्य धोक्यात
रावणवाडी : ग्रामीण भागातील बहुतांश हॉटेल, रेस्टॉरेट व्यवसायिक नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ ग्राहकांच्या माथी मारत आहेत. कच्या सामग्रीपासून वेगवेगळे पदार्थ बनविण्यात येत असताना अन्न औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) अधिकारी मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत झोेपेचे सोंग घेऊन बसले आहेत.
केवळ सणासुदीच्या दिवसात हॉटेल, मिठाई व्यवसायीकांकडे मोजक्या दिवसासाठी तपासणी मोहीम राबविणारे एफडीएचे अधिकारी वर्षभर मात्र बेफिकीर असतात. या विभागातील अधिकारीच ग्रामीण भागातील व्यावसायिकांना निकृष्ट खाद्यपदार्थ विकण्याची मुभा देत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. हॉटेल व्यवसायात अन्न पदार्थ, विविध व्यंजने तयार करण्यासाठी असणाऱ्या नियमावलींची अंमलबजावणीच केली जात नाही. तरीही त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. दररोज हजारो रुपयांचा व्यवसाय करणारे हॉटेल मालक ग्राहकांच्या आरोग्याची मात्र कोणतीही काळती घेत नाहीत.
निकृष्ट दर्जाच्या साहित्यापासून तयार करण्यात येणार व्यंजन सर्रास विकल्या जात आहे. मात्र सामान्य ग्राहकांच्या त्याच्या दूष्परिणामाची कल्पनाच नसते. त्यामुळे ते पदार्थ बिनधास्तपणे खाऊन ग्राहक विविध आजाराला आमंत्रण देत असतात. ग्रामीण भागात दिवसेंदिवस हा व्यवसाय फोफावत चालला आहे. या सर्व प्रकारावर नियंत्रण आणण्याचे काम अन्न व औषध प्रशासनाचे असताना त्यांच्याकडून त्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे.
हॉटेल व्यावसायिक वेगवेगळी शक्कल लढवित गोड मिठाईत अमर्याद साखरेचा उपयोग करून रासायनिक रंगाने आकर्षक करून विकतात. पण ग्रामीण भागात एफडीएच्या अधिकाऱ्यांनीही कधीही त्यांच्या हॉटेलमधील नमुने घेतल्याचे उदाहरण दिसून येत नाही. (वार्ताहर)