भेसळयुक्त पदार्थांमुळे आरोग्य धोक्यात
By Admin | Updated: November 1, 2014 02:00 IST2014-11-01T02:00:08+5:302014-11-01T02:00:08+5:30
तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील बऱ्याच गावात हॉटेल्समधून सर्रास निकृष्ट व भेसळयुक्त खाद्य पदार्थांची सर्रास विक्री होत आहे.

भेसळयुक्त पदार्थांमुळे आरोग्य धोक्यात
गोंदिया : तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील बऱ्याच गावात हॉटेल्समधून सर्रास निकृष्ट व भेसळयुक्त खाद्य पदार्थांची सर्रास विक्री होत आहे. अस्वच्छ वातावरणात होत असलेल्या भेसळयुक्त खाद्य पदार्थांच्या विक्रीमुळे नागरिकांना विविध आजारांची लागण होऊन त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
अन्न व नागरी औषध प्रशासन विभाग तांत्रीक कारणांवरून औषध विक्रेत्यांवर कारवाई करतात. मात्र हॉटेल्समधून विकल्या जाणाऱ्या भेसळयुक्त व निकृष्ट खाद्य पदार्थांकडे या विभागाचे लक्ष असल्याचे दिसत नाही. विशेष म्हणजे जिल्हा अन्न औषध प्रशासन विभाग या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करताना दिसून येतो. परिसरात असलेल्या बहुतांश हॉटेल्समध्ये विकल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थांची निर्मिती अस्वच्छ जागेत व उघड्यावरच केली जाते.
शिवाय रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांची धूळ खाद्य पदार्थांवर बसत असल्यामुळे या खाद्य पदार्थांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. हॉटेल्समधील पिण्याचे पाणी साठवून ठेवणारी भांडी स्वच्छ राहत नसून त्यात साठवलेले पाणी नागरिकांना प्यायला दिले जाते. तर जास्त नफा कमविण्यासाठी निष्कृष्ट साहीत्य वापरून खाद्य पदार्थ तयार केले जातात. शिवाय हॉटेल्समध्ये काम करणाऱ्या व खाद्य पदार्थाची निर्मिती करणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी कधीच करण्यात येत नसल्यामुळे याचाही थेट परिणाम खाद्य पदार्थ घेणाऱ्या ग्राहकांवर होत असतो.
प्रत्येक गावात बस थांबा, रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात लहान मोठे हॉटेल्स थाटले असल्यामुळे नागरिकांना याच हॉटेल्समधून खाद्य पदार्थ घेणे भाग पडते. चमचमीत आणि तेलयुक्त खाद्य पदार्थांमध्ये भेसळ तर असतेच शिवाय ते शिळे असल्याचीही शक्यता टाळता येत नाही.
हे खाद्य पदार्थ येणाऱ्या -जाणाऱ्यांच्या नजरेत पडावे यासाठी समोरच ठेवले जातात. मात्र त्यावर रस्त्यावरची धूळ व माशा बसतात त्याकडे लक्ष दिले जात नाही. हेच पदार्थ सामान्य माणूस खरेदी करून खातो. त्यानंतर मात्र त्यांना आजारी पडावे लागते. यातही चिमुकल्यांना तर जास्तच त्रास होतो. सध्या दिवाळीची धामधूम सुरू असून मोठ्या प्रमाणात नाश्ता व मिष्ठान्न तयार केले जात आहे. यात भेसळीचे प्रकार टाळता येत नाही. असे असतानाही मात्र अन्न व औषध विभागाकडून काहीच पाऊलं उचलण्यात आले नसल्याचे दिसते. यामुळे हॉटेलवाल्यांचे फावते. अशात अन्न औषधी प्रशासन विभागाने वेळोवेळी हॉटेल्सची तपासणी करावी अशी मागणी सर्व सामान्य नागरिकांकडून केली जात आहे. (शहर वार्ताहर)