कोट्यवधी खर्च करूनही आरोग्य विभाग आजारी

By Admin | Updated: June 22, 2014 00:03 IST2014-06-22T00:03:13+5:302014-06-22T00:03:13+5:30

देवरी, सालेकसा, अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा या तालुक्यात पावसाळ्यात साथीचे रोग अक्षरश: थैमान घालतात. त्यावर अंकुश लावण्यात आरोग्य आणि जिल्हा हिवताप कार्यालयाच्या नाकीनऊ येते.

The health department is sick even after spending billions | कोट्यवधी खर्च करूनही आरोग्य विभाग आजारी

कोट्यवधी खर्च करूनही आरोग्य विभाग आजारी

गोंदिया : देवरी, सालेकसा, अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा या तालुक्यात पावसाळ्यात साथीचे रोग अक्षरश: थैमान घालतात. त्यावर अंकुश लावण्यात आरोग्य आणि जिल्हा हिवताप कार्यालयाच्या नाकीनऊ येते. एकीकडे कोट्यवधी रुपये खचून आरोग्य सेवा पुरविण्याचा ढोल पिटणाऱ्या या विभागाने रिक्तपदांमुळे मान खाली घातली. हा विभाग स्वत:च आजारी आहे.
जिल्हा हिवताप विभागात मंजूर नियमित ९८ पैकी तब्बल ५७ कंत्राटी आरोग्यसेवकांना मानधन देण्याकरिता निधी नसल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे. आरोग्य विभाग पुन्हा किती जणांचा जीव घेणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्यसेवा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरु केला. उपकेंद्र ते जिल्हा परिषद आणि जिल्हा सामान्य रुग्णालय ते जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय, सर्वांनाच कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्याची मोकळीक दिली. मात्र, हा निधी फक्त खरेदी आणि बांधकामावरच जास्त खर्च झाला. प्रत्यक्षात सर्वसामान्य नागरिकांना अद्याप खासगी डॉक्टरांवरच अवलंबून राहावे लागत आहे. देवरी, अर्जुनी मोरगाव, सालेकसा तालुक्यांतील जंगलव्याप्त भागात रुग्णालये आहेत. मात्र, वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहत नसल्यामुळे अप्रशिक्षित खसगी डॉक्टरांचे पीक आले. चालू आर्थिक वर्षात तीन महिन्यांत चौघांचा हिवतापाने बळी गेला. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील विहीरगाव, केशोरी आदी गावांतील नागरिकांना हिवताप आणि डेंग्यूची लागण झाली. गतवर्षी पावसाळ्यात अनेक गावांना साथीच्या आजाराने थैमान घातले होते. मात्र, वेळीच जागेल तो आरोग्य विभाग कसला. राज्य शासनातर्फे या विभगाला फवारणी, साथरोग नियंत्रण, रक्त नमुने तपासणी आदी कामांची जबाबदारी देण्यात आली. परंतु मुख्यत्वे गावस्तरावर काम करणाऱ्या आरोग्यसेवकांचीच पदे गेल्या कित्येक वर्षापासून रिक्त असल्यामुळे विभागाला दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता होऊ शकत नाही. जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाला नियमित आरोग्यसेवकांची ९८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी तब्बल ५७ पदे अद्याप रिक्त आहेत. त्याचबरोबर १६ कंत्राटी आरोग्यसेवकांची पदे मंजूर आहेत. ३१ मार्चपासून निधी नसल्याचे कारण सांगून ती पदे अद्याप भरली नाही.

Web Title: The health department is sick even after spending billions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.