‘हाजराफॉल’चे आकर्षण, पण सुविधांचा अभाव
By Admin | Updated: August 23, 2015 00:14 IST2015-08-23T00:14:08+5:302015-08-23T00:14:08+5:30
जिल्ह्यात पावसाळी पर्यटन म्हटले की सर्वात आधी आठवते ते हाजराफॉल. छत्तीसगड सीमेकडे महाराष्ट्राच्या टोकावरील ...

‘हाजराफॉल’चे आकर्षण, पण सुविधांचा अभाव
विजय मानकर/रवी सोनवणे सालेकसा
जिल्ह्यात पावसाळी पर्यटन म्हटले की सर्वात आधी आठवते ते हाजराफॉल. छत्तीसगड सीमेकडे महाराष्ट्राच्या टोकावरील दरेकसापासून १ किलोमीटर आणि सालेकसापासून १० किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा सध्या गोंदिया जिल्ह्यातीलच नाही तर पूर्व विदर्भातील आणि छत्तीसग, मध्यप्रदेशातील पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करीत आहे. मात्र या ठिकाणी पर्यटकांसाठी आणखी सुविधा दिल्यास या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढू शकतो. यातूनच अनेकांना स्वयंरोजगार मिळू शखतो.
दरेकसा परिसरातून वाहत असणारे सर्व नदी-नाले एकत्र येवून त्यांचे पाणी उंच पहाडावरून खाली पडते. धबधब्याचे हे दृश्य मन प्रफुल्लित करणारे असते. दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून बाहेर येऊन काही क्षण निवांत घालविण्यासाठी साहजिकच पर्यटकांचे पाय इकडे वळतात.
पावसाळा सुरू होताच धनेगाव, कोपालगड व दलदलकुही या तिन्ही नाल्यांचा त्रिवेणी संगम होवून हाजराफॉलवरील पहाडावर एकाच ठिकाणी पाणी एकत्रित होते व ते पाणी तेथील डोहातून खाली कोसळते. सुरूवातीला पडणारे पाणी गढूळ व लाल-पिवळ्या रंगाचे असते. परंतु जसजसा गढूळपणा दूर होतो, तसतशी पाण्यात शुभ्रता वाढते आणि हाजराफॉलचे सौंदर्य खुलत जाते. पूर्व भागातील सतपुडा पर्वतरांगेच्या कुशीत असलेला हा धबधबा आॅगस्ट महिन्यात जास्तच आकर्षक बनतो. मोठ्या हिरव्या-काळ्या गलिच्यावरून कुणी सतत दूध सोडत आहे की काय असा भास तिथे होतो. या धबधब्याचे पाणी खाली पडून एका डोहात जमा होवून नंतर ते कुआढास नाल्याच्या माध्यमातून वाघनदीला जावून मिळते.
या सुविधा पुरविण्याची गरज
येथे येणारे पर्यटक दूरवरून येतात. त्यामुळे त्यांना येथे लघुशंका, शौचालयाची सोय कुठेच नाही. यात महिला पर्यटकांची कुचंबना होते. येथील नैसर्गिक वातावरणात मुक्तपणे बागडणाऱ्या मुलांना भूक लागतो. त्यामुळे येथे त्यांना खाण्यासाठी कोणतेही नाविन्यपूर्ण गोष्टी मिळत नाहीत. अल्पोपहाराचीही सोय येथे नाही. एखादी भुट्ट्याची गाडी, चिप्सचे पाकिट विकणारा किंवा चहावाला फिरताना दिसतो. पण शांतपणे बसून काही खाण्यासाठी येथे प्रशासनाने सोय करावी अशी अपेक्षा पर्यटक व्यक्त करीत आहेत.
या ठिकाणी साहसी खेळांसाठी जी सोय केली आहे त्याचप्रमाणे या निसर्गरम्य ठिकाणी चांगले गार्डन विकसित केले जाऊ शकते. त्या गार्डनमध्ये झुले, घसरणपट्ट्या व इतर खेळ, मोठ्यांना बसण्यासाठी बाकडे, प्राण्यांच्या प्रतिकृती असे बरेच काही करणे शक्य आहे. त्याची देखभाल वन समितीकडे ठेवल्यास त्याचे योग्य व्यवस्थापन होऊ शकते.
स्वत:च्या चारचाकी वाहनाने हाजराफॉलला येणे सर्वांनाच शक्य नसते. त्यामुळे अनेक पर्यटक रेल्वेने हे स्थळ गाठतात. दरेकसा स्थानकावर आल्यानंतर तेथून हाजराफॉलला जाण्यासाठी कोणतेच वाहन उपलब्ध नसते. त्यामुळे पायीच एक किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. वृद्ध, अपंग पर्यटकांची अशावेळी मोठी फजिती होते. त्यामुळे दरेकसा बस स्थानक आणि रेल्वे स्थानकावर आॅटोसारख्या वाहनाची सोय करणे गरजेचे आहे.
साहसी खेळ झाले आकर्षण
येथे मुलांसाठी विविध साहसी खेळ आणि कसरती करण्याचे साधन येथे उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे हा परिसर आता मुलांसाठीसुध्दा आकर्षणाचे केंद्र बनले आहे. यात बरमा ब्रिज, मल्टीवाईन ब्रिज, व्ही शेपब्रिज, कमांडो नेट या खेळांचा समावेश आहे. पर्यटन व इको टूरिजम विकास योजनेंतर्गत खेळांसाठी अनेक साधन उपलब्ध आहेत.
आनंद घ्या, पण नसते साहस नको!
सालेकसा-दरेकसा मार्गावरून हाजराफॉल परिसरात प्रवेश करताच हिरवीगार वनराई, विविध औषधी गुणांनी परिपूर्ण असलेले वृक्ष, असंख्य जातीची लहान-मोठी झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात. दूरूनच हाजराफॉल बघून मन प्रफुल्लीत होते. जवळ परिसरात गेल्यावर धबधब्यातून पाणी तलावात पडताना त्यातून पाण्याचे उडणारे तुषार शेकडो मीटर दूरपर्यंत पसरतात. ते शरीराला स्पर्शून नवचेतना निर्माण करतात. पर्वतराजीचे मनोहारी दृश्य सतत बघावेसे वाटते. याशिवाय परिसरात फिरायला मोकळा परिसर व शुद्ध प्राणवायूने हे स्थळ आहेत. काही अंतरावरून गेलेला मुंबई-हावडा रेल्वे मार्ग, त्यावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्या धबधब्यातून निर्माण होणाऱ्या संगीताला चांगलीच साथ देतात. शांत, निरव जंगल परिसरात कोणाकडून येणाऱ्या एखाद्या पक्ष्याचे किंवा प्राण्याचे आवाज अचानक कानावर पडताना वेगळीच अनुभूती झाल्याशिवाय राहात नाही. या संपूर्ण नैसर्गिक गोष्टींचा आनंद घेताना नसते साहस कोणी करू नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे, अन्यथा ते अंगलट येऊ शकते.