‘शो पीस’ ठरत आहेत शहरातील हॅँडवॉश स्टेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:00 IST2020-07-18T05:00:00+5:302020-07-18T05:00:36+5:30

कोरोनापासून सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी बाजारात तसेच कार्यालयात आल्यास प्रथम येथे हात धुवावे हा या मागील मुख्य उद्देश होता.सुरूवातीला काही दिवस हा प्रयोग नियमितपणे राबविण्यात आला. नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला. आजघडीला काही ठिकाणचे हे हँडवॉश स्टेशन उपयोगात दिसत नसून एका कोपऱ्यात पडून असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

Handwash stations in the city are becoming 'show pieces' | ‘शो पीस’ ठरत आहेत शहरातील हॅँडवॉश स्टेशन

‘शो पीस’ ठरत आहेत शहरातील हॅँडवॉश स्टेशन

ठळक मुद्देवापर न करता कोपऱ्यात पडून : ना सॅनिटायझर, ना साबण, उपाययोजनेकरिता नगर परिषदेने झटकले हात

कपिल केकत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील बाजार तसेच कार्यालयांत येणाºया नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हात स्वच्छ धुण्यासाठी नगर परिषदेने हँडवॉश स्टेशन लावले आहेत. मात्र आजघडीला या हँडवॉश स्टेशनचा वापर होत नसून ते एका कोपऱ्यात पडलेले दिसत आहे. शिवाय, यामध्ये ना सॅनिटायझर आहे ना साधी साबण अशात हे हँडवॉश स्टेशन फक्त ‘शो पीस’ ठरत आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे याला प्रतिबंध लावण्यासाठी प्रशासनातर्फे विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. मात्र यात सातत्याने नसल्याने या उपाययोजनांचाच पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक नगर परिषदेने नागरिकांची ये-जा असलेल्या ठिकाणांवर हँडवॉश स्टेशन लावले होते.
यात नगर परिषद कार्यालय, सुभाष शाळेतील बाजार, हिंदी टाऊन शाळेतील बाजार, स्टेडियममधील बाजार, नवीन प्रशासकीय इमारत, न्यायालय व सर्कस मैदान जवळील हनुमान मंदिर येथे अशा ७ ठिकाणी हँडवॉश स्टेशन ठेवले होते. यांतर्गत, एका लोखंडी स्टँडमध्ये पाण्याची टाकी बसवून सोबतच सॅनिटायजर ठेवले जात होते.
कोरोनापासून सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी बाजारात तसेच कार्यालयात आल्यास प्रथम येथे हात धुवावे हा या मागील मुख्य उद्देश होता.सुरूवातीला काही दिवस हा प्रयोग नियमितपणे राबविण्यात आला. नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला. आजघडीला काही ठिकाणचे हे हँडवॉश स्टेशन उपयोगात दिसत नसून एका कोपऱ्यात पडून असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
या हँडवॉश स्टेशनमध्ये अग्निशमन विभागाची गाडी येऊन पाणी टाकते.मात्र सोबत सॅनिटाझजर किंवा साबण तेथे असणे गरजेचे आहे. पण सध्या स्थितीत या हँडवॉश स्टेशनमध्ये ना सॅनिटायझर, ना साबण दिसत आहे. म्हणूनच नगर परिषदेने लावलेले हँडवॉश स्टेशन आजघडीला फक्त ‘शो पीस’ ठरत आहेत.

फक्त पैशांची नासाडी
नगर परिषदेने एका चांगल्या उद्देशातून हे हँडवॉश स्टेशन लावले होते, यात शंका नाही. मात्र त्यांच्या देखरेखीकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची तुटफुट झाली आहे. आठ हजार रूपये किंमतीचे एक या प्रमाणे शहरात ५६ हजार रूपये खर्च करून ७ हँडवॉश स्टेशन लावण्यात आले आहेत. मात्र त्यांची तुटफुट व उपयोग होत नसल्याने फक्त पैशांची नासाडी केल्याचे चित्र आहे.

सुभाष शाळेतील स्टेशन कचऱ्यात
नगर परिषदेने सुभाष शाळेत भरत असलेल्या बाजारात येणाऱ्या नागरिकांसाठी हँडवॉश स्टेशन लावले होते. मात्र आजघडीला त्याची तोडफोड करण्यात आली असून कुजलेल्या भाज्या टाकतात त्या कोपºयात टाकून देण्यात आले आहे. हात धुण्यासाठी असलेल्या पाण्याचा वापर भाजीवाले भाज्या धुण्यासाठी करत असल्याचेही ऐकीवात आहे.

Web Title: Handwash stations in the city are becoming 'show pieces'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.