२० वर्षांपासून हाजराफॉल बेवारस
By Admin | Updated: August 3, 2014 23:28 IST2014-08-03T23:28:12+5:302014-08-03T23:28:12+5:30
एकेकाळी सतत वन विकास महामंडळाच्या देखरेखीत असलेला हाजराफॉल परिसर मागील जवळपास २० वर्षांपासून बेवारस व नियंत्रणाबाहेर झालेला दिसत आहे. त्यामुळे येथे कोणीही केव्हाही

२० वर्षांपासून हाजराफॉल बेवारस
विजय मानकर - सालेकसा
एकेकाळी सतत वन विकास महामंडळाच्या देखरेखीत असलेला हाजराफॉल परिसर मागील जवळपास २० वर्षांपासून बेवारस व नियंत्रणाबाहेर झालेला दिसत आहे. त्यामुळे येथे कोणीही केव्हाही बेरोकटोक पणे येतात आणि वाटेल ते कृत्य करून जातात. त्यामुळे याचा परिणाम येणाऱ्या पर्यटकांसोबतच येथील नैसर्गिक सौंदर्यासोबत बहुमूल्य वनसंपत्ती आणि वन्य प्राण्यांवर झालेला आहे. आज हा परिसर उजाड होण्याच्या वाटेवर जाताना दिसत आहे. अशा परिस्थितीत हाजराफॉल परिसराचा वाली कोण, असा ही प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होत आहे.
२५-३० वर्षापूर्वीचा दृश्य आठवला तर आपणास असे माहीत होईल की, हाजरा परिसर पूर्णत: वनविकास महामंडळाच्या नियंत्रणात होते. या ठिकाणी कर्मचारी व अधिकारी राहण्यासाठी क्वार्टर असलेली एक वसाहत होती. यात पिण्याच्या पाण्यासाठी विहिर, वीज पुरवठा व इतर आवश्यक सोयी सुविधा पुरेशा प्रमाणात होत्या. त्याचबरोबर येथे एक पिठाची चक्कीसुद्धा होती. येथे पीठ दळण करण्यासाठी जमाकुडो, दरेकसा येथील लोक येत होते. सर्व सोयी सुविधाअसून वनीकरणाचे प्रकल्प चालत होते व वनसंवर्धन करण्याच्या दिशेने आवश्यक ते सर्व कार्यक्रम या ठिकाणी राबविण्यात येत होते. त्या माध्यमातून अनेक कर्मचारी येथे कार्यरत होते. त्याचबरोबर या परिसरातील अनेक बेरोजगार युवकांना काम मिळत होते. तसेच मजूर वर्गांंनासुद्धा वर्षभर मजुरीचे साधन प्राप्त होत होते. त्यामुळे या परिसरात सतत प्रत्येक बाबीवर नजर व नियंत्रण होते. या परिसरात वनविकास महामंडळाचे एक विश्राम गृह सुद्धा होते. त्यात द्वितीय श्रेणीचे दोन सूट, विश्राम कक्ष, स्वयंपाक घर व इतर खोल्यांचा समावेश होता. त्या खोल्यांना अमलतास, पारीजात, रोहण असे नाव देण्यात आले होते. या ठिकाणी अनेक अधिकारी, पदाधिकारी येवून विश्रांती व मुक्काम करीत होते. त्यामुळे सतत वनविकास महामंडळाचे कर्मचारी, चौकीदार आदी सेवेत व देखरेखीत तत्पर होते. बाहेरुन आलेल्या प्रत्येकांना आकर्षित व प्रभावित करणारे असे हे परिसर होते. परंतु ८० आणि ९० च्या दशकात काही अप्रिय घटना घडल्यामुळे या परिसराचे हे वैशिष्ट्य लुप्त झाले. येथील वैभव नष्ट झाले आणि हाजराफॉल परिसर बेवारस झाले. आज या परिसराचा कोणी वाली दिसत नाही. प्रशासन, वन विभाग व लोकप्रतिनिधी कोणीही याकडे विशेष लक्ष देण्यास रस घेताना दिसत नाही.
८० च्या दशकात वाघाचा धुमाकूळ वाढलेला होता. तर ९० च्या दशकात नक्षली कारवाया व दहशतीमुळे या परिसराला सोडून पलायन झाले. हाजराफॉल अनाथ झाले. १९८४-८५ च्या दरम्यान एकदा वाघाने एका कर्मचाऱ्याच्या मुलाला घरुन रात्री झोपेत असताना उचलून नेले व त्याचे भक्षण केले. त्यामुळे येथील वसाहतीत राहणारे सर्व कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय दहशतीत आले. त्यानंतरही वाघाचा आक्रमणकारी वावर सुरुच राहीला. नाईलाजाने येथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वसाहत सोडली. एकीकडे दहशतीचे वातावरण असताना त्याच काळात नक्षली कारवायासुद्धा होऊ लागल्या व शासनाचा निषेध म्हणून नक्षलीवादी वेगवेगळ्या ठिकाणी शासकीय, निमशासकीय संपत्तीची जाळपोळ व नुकसान करू लागले. कर्मचाऱ्यांनी वसाहत सोडल्यानंतरही येथील विश्राम गृहाची देखरेख व उपयोग सुरू राहीला. इतर उपक्रम सुद्धा सुरू राहीले.
परंतु नक्षलवाद्यांनी विश्रामगृहाला टार्गेट केले व त्यालाही जाळून राख करून टाकले. त्यानंतर या परिसरात कोणीही रात्री थांबायला तयार झाला नाही. आज परिस्थिती बघितल्यावर असे दिसले की येथील क्वार्टर व विश्रामगृह सगळे जमिनदोस्त झाले आहेत. सर्व योजना बंद झाल्या आहेत. ज्या कर्मचाऱ्यांकडे या परिसराची देखरेख असेल ते दिवसात सुद्धा या परिसरात सतत देखरेख करताना दिसत नाही. त्यामुळे या परिसरात प्राण्यांची शिकार व किमती वृक्षांची कत्तल यांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी वने नष्ट होण्याच्या मार्गावर तर प्राणी लुप्त होण्याच्या वाटेवर गेले आहेत. अशात येथे हाजराफॉल परिसर बेवारस झाल्यामुळे कोणीही कुठलाही व्यक्ती केव्हाही येऊन येथे बिनधास्त वावरतो. निसर्गाशी छेडछाड करून जातो व जीवाला धोका ओढवून घेतो.