गोंदियात मधमाशांच्या हल्ल्यात पालकमंत्री राजकुमार बडोले जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 13:17 IST2018-02-09T13:17:08+5:302018-02-09T13:17:24+5:30
राष्ट्रीय उद्यान पर्यटक संकुल परिसरातील वन्यजीव विभागाच्या लॉगहट विश्रामगृहातील मधमाशांनी अचानक हल्ला केल्याने यात पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्यासह तीन जण किरकोळ जखमी झाले. ही घटना गुरूवारी (दि.८) दुपारच्या सुमारास घडली.

गोंदियात मधमाशांच्या हल्ल्यात पालकमंत्री राजकुमार बडोले जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील राष्ट्रीय उद्यान पर्यटक संकुल परिसरातील वन्यजीव विभागाच्या लॉगहट विश्रामगृहातील मधमाशांनी अचानक हल्ला केल्याने यात पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्यासह तीन जण किरकोळ जखमी झाले. ही घटना गुरूवारी (दि.८) दुपारच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार पालकमंत्री बडोले हे अर्जुनी-मोरगाव येथे १५ ते १६ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचा आढावा घेण्यासाठी येथील लॉगहट विश्रामगृहात आले होते. या संमेलनाच्या समारोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे संमेलनाच्या यशस्वी आयोजन व समित्यांची स्थापना करण्यासाठी भाजपच्या वतीने विश्रामगृहावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक बोलविली होती. पालकमंत्री विश्रामगृहाच्या वºहांड्यात बसून आढावा घेत असताना अचानक मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. कार्यकर्ते सैरावरा पळायला लागले. पालकमंत्री बडोले, नवेगावबांधचे सरपंच अनिरुद्ध शहारे, पालकमंत्र्यांचे स्वीय सचिव समीर बन्सोडे, भाजपा जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर यांना मधमाशांनी चावा घेतला. पालकमंत्री या विश्रामगृहावर येणार हे माहित असताना सुध्दा एक वनरक्षक उके व चौकीदार जगदीश मेश्राम यांच्या व्यतिरिक्त कुणीही अधिकारी उपस्थित नव्हते. मधमाशांनी अचानक केलेल्या हल्लानंतर ही बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घेण्यात आली. वनपरिक्षेत्राधिकारी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव विभाग) नागपूर कार्यालयात वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत कार्यशाळा असल्यामुळे उपविभागीय अधिकारी व वनपरिक्षेत्राधिकारी यावेळी उपस्थित नसल्याचे सांगितले.