‘पालकमंत्रीजी, आमचंही थोडं ऐका’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:45 IST2021-02-05T07:45:53+5:302021-02-05T07:45:53+5:30
अर्जुनी मोरगाव : प्रदीर्घ काळानंतर जनता दरबार होतंय, खरंच अर्जुनी मोरगाववासीयांसाठी यापेक्षा सुखद क्षण असूच शकत नाही. कोणत्या तरी ...

‘पालकमंत्रीजी, आमचंही थोडं ऐका’
अर्जुनी मोरगाव : प्रदीर्घ काळानंतर जनता दरबार होतंय, खरंच अर्जुनी मोरगाववासीयांसाठी यापेक्षा सुखद क्षण असूच शकत नाही. कोणत्या तरी काळी असे दरबार भरायचे, पण मंत्रीमहोदयांचे दरबार महादेव शिवनकरांनंतर इतक्या वर्षांत बघितलेच नाही. त्यामुळे हा अर्जुनीवासीयांसाठी ऐतिहासिक किंवा सुवर्ण अक्षरांनी कोरणारा क्षण असेल, यात शंकाच नाही, पण या दरबारात जनसमस्यांचे निराकरण होणे गरजेचे आहे, अन्यथा हा केवळ देखावा ठरू नये म्हणजे झालं. अर्जुनी नगरीत आपल्या आगमनाच्या निमित्ताने आम्ही तालुक्यातील अत्यंत ज्वलंत समस्या मांडण्याचा प्रयत्न करतोय. आपण आमचे पालक आहात, आमच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न कराल, अशी आपल्याकडून रास्त अपेक्षा आहे.
मृतांनाही ताटकळत बसावे लागते, हे जरा आश्चर्यकारक शीर्षक वाटते, पण पालकमंत्रीजी हे अगदी खरं आहे. अर्जुनी मोरगाव या तालुक्याच्या ठिकाणी मृतकांना जाळण्यासाठी वन आगारात लाकडे उपलब्ध राहात नाही, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. नवेगावबांध किंवा गोठणगाव येथील आगारातून आणण्यासाठी सांगितले जाते. सामान्य माणसाला वाहतुकीचा खर्च पेलवणारा नसतो, शिवाय मृतदेहाला जाळण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागते. स्थानिक स्मशानभूमीत लाकडांशिवाय मृतदेह जळतील, अशी पर्यायी सुविधा उपलब्ध नाही.
......
ग्रामीण रुग्णालयाचे वाजले बारा
जिल्हा मुख्यालयापासून तालुक्याचे अंतर ८० किमी आहे. तालुक्यात शेवटचा गाव ३५ किमी अंतरावर आहे. हा तालुका जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. येथे उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा नाहीत. ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची प्रदीर्घ काळापासूनची मागणी आहे. ही अद्याप पूर्णत्वास येऊ शकली नाही, ही दुर्दैवी बाब आहे. अर्जुनी मोरगावचे ग्रामीण रुग्णालय आजारी आहे, हे दुसरं आश्चर्य आहे. साहेब येथे एड्सच्या रुग्णावर नियमित शल्यकक्षात हायड्रोसिलची शस्त्रक्रिया होते. त्यानंतर, तिथेच आणखी इतर रुग्णांवर शस्त्रक्रिया होतात. शस्त्रक्रियेनंतर दोन दिवसांत एड्सचा रुग्ण दगावतो, तरीही काहीच कारवाई होत नाही. असा सामान्य रुग्णांच्या जिवाशी खेळ केला जातो. या रुग्णालयातील सर्व परिचारिका कंत्राटी आहेत. नियमित एकही नाही. क्ष-तंत्रज्ञ व नेत्र तंत्रज्ञ सेवानिवृत्त झाले. ही दोन्ही पदे रिक्त आहेत. गर्भवती महिलांसाठी सोनोग्राफीची व्यवस्था नाही. ईळदा येथील सुसज्ज आरोग्यवर्धिनी इमारत नववधुसारखी नटूनथटून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
.........
शासकीय समित्यांच्या नियुक्त्या केव्हा
राज्यात महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर दीड वर्षे लोटले. मात्र, शासकीय समित्यावर अद्याप नियुक्त्या झाल्या नाहीत. साहेब दीड कोटी रुपये खर्च करून येथे क्रीडा संकुल तयार करण्यात आले. क्रीडा संकुलाची इमारत उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला भाड्याने दिली आहे. येथे तालुका क्रीडा अधिकारी नाहीत. जिल्ह्याचा सर्व क्रीडा कारभार गोंदियाच्या वातानुकूलित खुर्च्यांवर बसून चालतो. नुसती दीड कोटींची इमारत बांधून उदयोन्मुख खेळाडू तयार होत नाही. साहेब, क्रीडा संकुलाच्या नावावर एवढा खर्च होऊनही मैदानी खेळ खेळलेच जात नाही. साहेब, आपणास वेळ असेल, तर निश्चितच क्रीडा संकुलाचे दीड कोटींचे पटांगण बघून या.
.........
सिंचनाची समस्या कायम
साहेब, इटियाडोह धरणाची निर्मिती १९६७ मध्ये झाली. खा.पटेल यांचे वडील स्व.मनोहरभाई पटेल यांचा धरणनिर्मितीत सिंहाचा वाटा आहे, असे ऐकले आहे. धरण बांधकाम पूर्ण होऊन हाफ सेंच्युरी झाली, पण कालवे तेच आहेत. कालवे जीर्ण झाल्याने दरवर्षी जागोजागी फुटतात. पाण्याची गळती होते. कालव्यात अमाप गाळ साचली आहे. त्यामुळे शेवटच्या टोकापर्यंत सिंचनासाठी पुरेसे पाणी पोहोचत नसल्याची शेतकऱ्यांची खदखद आहे. संबंधित विभागाने दुरुस्ती प्रारूप सादर केला आहे, पण शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष द्यायला कुणाजवळच सवड नाही. इटियाडोह, नवेगावबांध तलावात खिंडसी तलावाच्या धर्तीवर बीओटी तत्त्वावर बोटिंगची सुविधा उपलब्ध होऊ शकते. यामुळे पर्यटन व स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
.........
केशोरी तालुक्यात घोषणा केव्हा?
साहेब, जिल्हा परिषद हायस्कूल अर्जुनी मोरगाव, बोडगावदेवी व नवेगावबांधच्या इमारती कौलारू आहेत. कवेलूचे कारखाने बंद झाले आहेत. कवेलू आणायचे कुठून, हा प्रश्न भेडसावतो. पोलीस ठाण्याची इमारत अत्यंत पुरातन आहे. पोलीस, पंचायत समिती व इटियाडोह पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांच्या वसाहती उद्ध्वस्त झाल्या आहेत. आयुक्तांचे लघू पशुचिकित्सालय आहे. सुसज्ज इमारत आहे. मात्र, डॉक्टरच नाहीत. त्यामुळे गोधन धोक्यात आले आहे. सुसज्ज बसस्थानक आहे. रात्रीला पाच बसेस मुक्कामी असतात. मात्र, कर्मचारी व प्रवाशांसाठी शौचालय नाही. केशोरी तालुक्याची प्रदीर्घ कालावधीपासून मागणी आहे. खा.पटेल साहेबांनी जबलपूर-चांदाफोर्ट या २६ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या नवीन रेल्वेचा अर्जुनी मोरगाव येथे थांबा मंजूर करावा, अशी रास्त अपेक्षा आहे.