रुग्णालयात वाढतेय गर्दी
By Admin | Updated: July 27, 2014 23:50 IST2014-07-27T23:50:31+5:302014-07-27T23:50:31+5:30
या आठवडाभरापासून येत असलेल्या पावसामुळे शहरातील नाल्या घाणीने माखल्या आहेत. वातावरणातील बदलामुळे साथीच्या रोगांची लागण सुरु झाली आहे. त्यामुळे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात

रुग्णालयात वाढतेय गर्दी
गोंदिया : या आठवडाभरापासून येत असलेल्या पावसामुळे शहरातील नाल्या घाणीने माखल्या आहेत. वातावरणातील बदलामुळे साथीच्या रोगांची लागण सुरु झाली आहे. त्यामुळे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांनी उपचारासाठी गर्दी केली आहे.
पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसह सर्वच चिंंतातुर झाले आहेत. पाऊसच नसल्याने वातावरण दूषित झाले आहे. ही स्थिती अनेक रोगांच्या आगमनाला कारणीभूत ठरल्याची कबुली वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. सध्या अतिसाराची लागण सुरु झाली आहे. अतिसाराने लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना हैराण केले आहे. खासगी रुग्णालये रुग्णांनी तुडूंब भरली आहेत. गरीब व सामान्य कुटुंबातील नागरिक मात्र पैशाअभावी केटीएस रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल होत आहेत. जिल्हाभरातून केटीएसमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे.
पावसाची हीच परिस्थिती कायम राहिल्यास अतिसारानंतर कावीळ, टायफाईड आदी साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता एका डॉक्टराने वर्तविली. गोंदियात अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव होत आहे. उघड्यावरील खाद्यपदार्थांची विक्री ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यावरील माश्यांचे घोंघावणेही नित्याचे झाले आहे. दूषित पाणी पिण्यात येत असल्यामुळे साथीच्या रोगांना आमंत्रण मिळत असल्याची कबुली एका डॉक्टराने दिली. शहरातील बहुतांश भागातील नाल्या तुडूंब भरल्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव झाला आहे.
सांडपाणी साचून राहात असल्याचे चित्र बऱ्याच वार्डात कायम आहे. नेहरू चौकात गेल्या चार-पाच दिवसांपासून पाणी साचून आहे. दररोज नागरिक पाणी तुडवत रस्ता ओलांडून जात आहेत. वातावरणात आलेला असमतोलपणा तसेच दूषित पदार्थांचे सेवन यामुळे अतिसार, डायरिया, फ्लू, मलेरिया, कॉलरा, टायफाईड, कावीळ आदी आजार बळावत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची संख्या बघता साथीच्या रोगांनी पाय पसरविले असल्याचे चित्र स्पष्ट होते. बहुतांश वॉर्डात बेडव्यतिरिक्त जमिनीवरसुद्धा रुग्णांवर औषधोपचार केला जात आहे.
गत आठवड्यापासून केटीएसमध्ये औषधोपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. नागरिकांनी साथीपासून वाचण्यासाठी स्वच्छतेकडे आवर्जून लक्ष द्यावे, शिळे अन्न खाऊ नये व वेळीच औषधोपचार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)