पावसाच्या विलंबाने करपली धानाची रोपे
By Admin | Updated: July 16, 2014 00:15 IST2014-07-16T00:15:21+5:302014-07-16T00:15:21+5:30
अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील काही मोजक्या गावांतील शेतीला इटियाडोह जलाशय, नवेगावबांध तलावाचे पाणी मिळते. उर्र्वरीत गावे मात्र जलसिंचनापासून आजही वंचित आहेत. त्यामुळे मागील

पावसाच्या विलंबाने करपली धानाची रोपे
दुबार पेरणीही अशक्य : बळीराजासमोर उभे ठाकले जीवनमरणाचे संकट
अमरचंद ठवरे - बोंडगावदेवी
अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील काही मोजक्या गावांतील शेतीला इटियाडोह जलाशय, नवेगावबांध तलावाचे पाणी मिळते. उर्र्वरीत गावे मात्र जलसिंचनापासून आजही वंचित आहेत. त्यामुळे मागील एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धानाची रोपे करपल्या गेली आहेत. आता दुबार पेरणी करून रोवणी करण्याचीही वेळ निघून गेल्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच खचून गेला. अशा परिस्थितीत पुढील वर्षभर संसाराचा गाडा कसा हाकणार, असा प्रश्न त्याच्यापुढे आ वासून उभा आहे.
रोहीणी, मृग, आर्द्रा हे पावसाचे नक्षत्र कोरडेच गेल्याने भोळाभाबडा शेतकरी पावसाची वाट पाहात पूर्णत: खचून गेला आहे. मृग नक्षत्रातील एक-दोन सरींमुळे शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे लावले. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने बियाण्यांची उगवणच झाली नाही. काही प्रमाणात वाढलेली रोपे मधल्या उघाडीदरम्यान तापलेल्या उन्हामुळे करपलेल्या अवस्थेत दिसत आहे. रोपे सुकल्याने दुबार पेरणी केल्याशिवाय गत्यंतर नाही.परंतू आता दुबार पेरणीही शक्य नसल्याचे कृषी विभाग सांगत आहे.
तालुक्यात पाच महसूल विभाग आहेत. नवेगावबांध महसूल विभागात ४०८१ हे.आर.क्षेत्र खरीप पिकाखाली आहे. अर्जुनी/मोरगाव ४९५४ हे, महागाव ५९११ हे., केशोरी ४६९४ हे., बोंडगावदेवी ३५६३ हे. क्षेत्र ेखरीप पिकाखाली अपेक्षित आहे. मृग नक्षत्राच्या सुरूवातीपासूनच पावसाने दगा दिल्याने धानाची उगवण पूर्णपणे झाली नाही. जी रोपे आज शेताच्या बांधावर दिसत आहेत, ती पूर्णत: करपलेल्या अवस्थेत आहेत. राष्ट्रीय पंचांगानुसार मृग, आर्द्रा हे पावसाचे नक्षत्र समजले जातात. परंतु आर्द्रा नक्षत्र पूर्णत: कोरडाच गेला, महागडी बी-बियाणे घेऊन शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकले. परंतु तळपत्या उन्हाने पऱ्ह्यांची रोपे पूर्णत: सुकून गेली.
गाढव वाहन घेऊन आलेल्या पूनर्वसू नक्षत्राने जोर दाखविण्याचे सोडून दिल्याने सूर्यराजाने आग ओकून जीवाची लाहीलाही केली. त्यात धानाचे पऱ्हे वाचविण्यासाठी भूमिपुत्रांनी शर्तीचे प्रयत्न केले, परंतु हातामध्ये पाणीच नाही तर पऱ्हे कुठून वाचणार अशी विदारक परिस्थिती तालुक्यात पहायला मिळाली. ज्या शेतकऱ्यांकडे स्वत:ची ओलिताची सोय आहे, त्यांनी काही तुरळक प्रमाणात धानाची रोवणी केली आहे. तळपत्या उन्हाने हिरवे दिसणारे पऱ्हे मात्र आज पूर्णत: सुकलेले दिसत आहे. आता पावसाने हजेरी लावली असली तरी त्याचा फायदा किती होईल याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
तालुक्यात २०८३८ हे. क्षेत्रात धान रोवणी तर ११९९ हेक्टर क्षेत्रात आवत्यासाठी अपेक्षीत आहे. पेरणी झाली, रोपे उगवली, परंतु पावसाअभावी बांधातील रोपे मरणासन्न झाली. पाऊस पडण्याचे चार नक्षत्र संपल्यात जमा आहे. परंतु पावसाचा जोर अजूनही वाढलेला दिसत नाही. त्यामुळे सर्वांचा पोशिंदा असलेला शेतकरी मोठ्या धर्मसंकटात सापडला आहे. आता त्यांना रोख स्वरूपात मदत देण्यासाठी शासनानेच पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा केली जात आहे.