केवळ कार्यक्रमानिमित्ताने आमदारांची ग्रामभेट
By Admin | Updated: July 16, 2014 00:16 IST2014-07-16T00:16:07+5:302014-07-16T00:16:07+5:30
आमदारांच्या यादीत नावापुरते गाव दत्तक म्हणून नोंद आहे. ना गावाचा विकास झाला, नाही आमदार समस्या जाणून घेत, जनताजनार्दनाने गाऱ्हाणी मांडायची कुणाकडे? गाव दत्तक घ्यायचे

केवळ कार्यक्रमानिमित्ताने आमदारांची ग्रामभेट
संतोष बुकावन - अर्जुनी/मोर.
आमदारांच्या यादीत नावापुरते गाव दत्तक म्हणून नोंद आहे. ना गावाचा विकास झाला, नाही आमदार समस्या जाणून घेत, जनताजनार्दनाने गाऱ्हाणी मांडायची कुणाकडे? गाव दत्तक घ्यायचे तर ते मॉडेल स्वरूपात इतर गावांना लाजवेल असे आदर्श गाव म्हणून नावारूपास यावे. मात्र या गावात समस्यांचा महापूर आहे अशा बोलक्या प्रतिक्रीया माहुरकुडा येथील गावकऱ्यांनी व्यक्त केल्या.
आ. राजकुमार बडोले यांनी २०१२-१३ मध्ये माहुरकुडा हे गाव दत्तक घेतले. गाव दत्तक घेतल्यापासून आमदारांचे कार्यक्रमांव्यतिरीक्त दर्शनच दुर्लभ झाले आहे. गाव जसे मोठे, तशाच समस्याही भरपूर आहेत.पण या समस्यांचे निराकरण करणारा वाली नाही. दत्तक गाव घेतेवेळी गावातील समस्या जाणून घेण्यासाठी दत्तक ग्राम पदाधिकाऱ्यांची केवळ एक सभा झाली. यापैकी कोणत्या समस्या सुटल्या, किती समस्यांच निराकरण व्हायचे आहे.याचा आढावा जाणून घेतला जात नाही. केवळ २०११-१२ मध्ये आमदार निधीतून ३ लाखाचे सभागृह बांधकाम झाले. गेल्या साडेचार वर्षात दत्तक गावावर झालेला हा खर्च म्हणजे गंगेतील तिर्थासारखा आहे.
या गावची लोकसंख्या २ हजार ८४३ आहे.शेती व शेतमजूरी हा गावकऱ्यांचा व्यवसाय योजनेंतर्गत भरपूर कामे झालीत.पण १० ते १२ कुटूंबाव्यतिरीक्त इतरांना वर्षभरात किमान १०० दिवस रोजगार प्राप्त होऊ शकला नाही. २०१२ मध्ये मग्रारोहयोजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्यात प्रथम आला आहे. या गावची नळयोजना अजूनही अपूर्णच आहे. या गावात चावडी, वाचनालय नाही. निर्मलग्रामसाठी हे गाव प्रस्ताविक आहे. बहुतांशी वन जमिनीवरील अतिक्रमण धारकांना अद्याप पट्टे मिळाले नाहीत. गावात काही डांबरीकरणाचे रस्ते आहेत. सिमेंटीकरणाचे नाहीत. बौध्द स्मारकासमोर चावडी बांधकामाचा ठराव घेण्यात आला. मात्र अद्यापही बांधकाम झाले नाही. या ग्रा.पं. अंतर्गत मालकनपूर येथील अंतर्गत रस्त्यांचे मजबूतीकरण, सार्वजनिक समाज मंदिराचे बांधकाम झाले नाही. माहुरकुडा व मालकनपूर येथे विज वितरण कंपनीकडून सिंगलफेम विद्युतीकरण झाल्याचे सांगण्यात येते. मात्र परिवर्तन झालेले दिसून येत नाही.
माहुरकुडा येथील जि.प. शाळेला नवीन इमारतीची गरज आहे. ग्रा.पं. भवन व जि.प. शाळेला सुरक्षा भिंत बांधकाम झाले नाही. तलाठी कार्यालय, विठ्ठल-रुखमाई मंदिरात समाजमंदिर बांधकाम व सौंदर्यीकरण, गोवारी स्मारक सौंदर्यीकरण, तुमडीमेंढा हनुमान मंदिराचे सौंदर्यीकरण, पंचशील चौकात बुध्दविहार व सुरक्षा भिंतीचे बांधकाम, बसस्टॉप व सिरोली फाट्याजवळ विंधन विहीरीच बांधकाम अद्यापही झाले नाही.
माहुरकुडा येथे वैद्यकीय अधिकाऱ्याच पद देण्याची बऱ्याच वर्षापासून मागणी केली ती पूर्णत्वास आली नाही. माहुरकुडा येथील तीन लहान व एक मामा तलावातील गाळ उपसा करण्यासाठी वनविभागाची परवानगी द्यावी ही मागणी मान्य झाली नसल्याने सिंचनक्षमतेत वृध्दी झाली नाही.परिणामी शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न उभा ठाकला आहे. पांदण रस्त्याचे खडीकरण, पाच आंबाकोंडी रस्त्यावरील नाला, तुमडीमेंढा रस्त्यावरील नाला येथे सीडी बांधकामाची गरज आहे. ग्रामपंचायतला व्यापारी संकुल बांधकामाच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखविण्यात आली.
माहुरकुडा येथे रस्त्यावर एक विद्युत खांब आहे. यामुळे वाहतुकीत खोळंबा निर्माण होतो ही मागणी पूर्ण झाली नाही. या मागण्यांचे निवेदन दत्तक ग्राम योजना अस्तित्वात आली तेव्हा आमदारांना देण्यात आले मात्र या मागण्यांचा विचारण केला गेला नाही.