सरकार बदलले, धान खरेदी ‘जैसे थे’
By Admin | Updated: December 18, 2015 02:20 IST2015-12-18T02:20:36+5:302015-12-18T02:20:36+5:30
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने दरवर्षी विविध धान खरेदी केंद्रांवरून धान खरेदी केली जाते.

सरकार बदलले, धान खरेदी ‘जैसे थे’
८० टक्के धान उघड्यावरच : मुख्यमंत्र्यांचे आश्वासन अपूर्णच
गोंदिया : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने दरवर्षी विविध धान खरेदी केंद्रांवरून धान खरेदी केली जाते. मात्र गोदामांची सोय नसल्यामुळे ७० ते ८० टक्के धान उघड्यावरच ठेवण्यात येतो. धानाची लवकर मिलिंग झाली नाही तर तो धान पाखड होतो. गेल्यावर्षीच्या धानातून ४० ते ५० हजार क्विंटल धान पाखड झाल्याचे सूत्रांनी सांगितले. यावर्षी पुन्हा आदिवासी विकास महामंडळाचा धान उघड्यावर राहणार असल्यामुळे पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने जिल्ह्यात पाच लाख ८० हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आला. यापैकी काही धान गोदामात, तर काही धान ओट्यांवर आणि ७० ते ८० टक्के धान उघड्यावरच ठेवण्यात आला. यापैकी ९४ ते ९५ टक्के धानाची मिलिंग करण्यात यंत्रणेला यश आले. मात्र ४० ते ५० हजार क्विंटल धान शिल्लक आहे. हा शिल्लक धानाचा साठा आता पाखड झाला आहे. त्यातच किती धान उघड्यावर ठेवण्यात आल्याने सडला, याची माहिती घेणे सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शासनाच्या वतीने धान साठविण्यासाठी गोदामांची अपुरी व्यवस्था आहे. गोदामांसाठी जागा शोधणे, फॉरेस्ट विभागाची परवानगी घेणे आदी प्रक्रिया सद्यस्थितीत सुरू आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने गोदामांचे काम पुढील पावसाळ्यापर्यंत पूर्णत्वास जाईल किंवा नाही, याबाबत संशय निर्माण होत आहे.
आदिवासी महामंडळाच्या परिसरातील धान खरेदी केंद्रांवर धान साठविण्याची सोय आहे. मात्र ही सोय पुरेसी नसल्याने ओट्यांवर धान साठविला जातो. त्यावर ताडपत्री घालून सुरक्षा केली जाते. तरीही धान दरवर्षीच पाखड होतो किंवा सडते.