गोपाला...गोपाला... देवकीनंदन गोपाला...

By Admin | Updated: February 28, 2017 01:03 IST2017-02-28T01:03:20+5:302017-02-28T01:03:20+5:30

खेडी रोगमुक्त व सुशिक्षित, साक्षर व्हावीत यासाठी ग्रामस्वच्छता अभियान काळाची गरज आहे, ...

Gopala ... Gopala ... Devkinainan Gopalala ... | गोपाला...गोपाला... देवकीनंदन गोपाला...

गोपाला...गोपाला... देवकीनंदन गोपाला...

जनजागरण : माणिक देशमुख यांनी हुबेहुब साकारले गाडगेबाबांचे कीर्तन
संतोष बुकावन अर्जुनी मोरगाव
खेडी रोगमुक्त व सुशिक्षित, साक्षर व्हावीत यासाठी ग्रामस्वच्छता अभियान काळाची गरज आहे, हा मूलमंत्र देणाऱ्या वैराग्यमूर्ती गाडगेबाबांचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे व्रत अमरावती येथील अभिरूची कला व क्रीडा मंदिरातर्फे ‘क्रांतियोगी गाडगेबाबा’ या एक तासाच्या नाट्य प्रस्तुतीकरणातून स्वीकारून जनजागरण करण्यात आले.
शनिवारी या कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक बांधकाम मंत्रालयातील उपसिचव फुलचंद मेश्राम यांनी स्थानिक जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ निर्मित व गाडगेबाबा अध्यासन केंद्र अमरावती विद्यापीठाद्वारे प्रायोजित कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.
भारत स्वतंत्र होऊन ६९ वर्षे झालीत. आजही खेडी अडाणी-अशिक्षित व अंधश्रद्धाळू आहेत, हे देशाचे दुर्दैव ! प्रगतीला खीळ बसविणाऱ्या या गोष्टींपासून मुक्तता मिळविण्यासाठी सर्वप्रथम खेडी शहरांशी जोडली पाहिजेत. शौचालय, वीज व पाणी या किमान गरजांची पूर्तता व्हायला हवी. तरच खेड्यातील मुलं शहरात शिकून शहाणी होतील.
‘जे आपणांसी ठावे,
ते इतरांशी सांगावे,
शहाणे करुन सोडावे सकल जना’
याप्रमाणे वागतील असे म्हणत त्यांनी हुबेहूब गाडगेबाबा साकारले.
विदर्भ संतपरंपरेतील एक अलौकिक व आगळा संत अवतरला. श्रम प्रतिष्ठेचा एक अद्भूत आविष्कार करणार कृषिपूत्र, वैराग्याचा एक अनोखा अवतार, ज्ञानगंगेचा शोध घेणारा एक मुक्तात्मा, ऋण काढून सण साजरा करु नका म्हणून सांगण्यासाठी आपला संसार उधळणारा एक मुसाफिर, लोकसेवक म्हणजे काय? याचा कृतीतून आदर्श देणारा एक महापुरुष, अनाथ अपंगाचा आधार, भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, बेघरांना घर मागणारा धर्मात्मा, अंधश्रद्धेला ठाम विरोध करणारा सश्रद्ध ज्ञानयोगी, जातीभेदाची कोळिष्टके, जळमटे, झुगारणारा क्रांतियोगी द्रष्टा सन्यासी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणून समाजप्रबोधन करणारा एक लोकसंग्राहक अशा अनेकविध उपाध्यांनी ओळखले जाणारे संत गाडगेबाबा. त्यांनी त्यावेळी दिलेला दृष्टांत आजही आधुनिक युगात लागू पडतो, नव्हे तर त्यांच्या कार्याची शिकवण या वैज्ञानिक युगाच्या पिढीला महाराष्ट्र शासनाद्वारे दिली जाते. त्यांचे तत्कालीन उपक्रम आज शासनाला राबवावे लागतात. असा हा वऱ्हाडातल्या शेंडगावचा देविदास व दापुऱ्याचा डेबू कर्मयोगी म्हणून ओळखला जातो. आपला संसार व घरदार सोडून माणसातील ईश्वर जागवण्यासाठी त्याने जीवाचे रान केले. त्यांच्यासोबत केवळ तुकारामांची अभंगवाणी व कबीराची वाणी होती. अपार कष्ट करण्याची तत्परता व प्रचंड सहनशीलतेच्या बळावर तो क्रांतियोगी बनला.
डोक्यावर खापरं, अंगावर बावला वेष, हातात काठी आणि दुसऱ्या हातात खराटा आणि मुखात गोपाला...गोपाला... देवकीनंदन गोपाला...चा जयघोष करणारा डेबू गाडगेबाबा झाला. ते आपल्या कीर्तनातून सांगतात.
‘कर्ज काढून देवाची यात्रा करू नका
गाई-बैलांची चिंता वाहात जा
मुलांना शिकविल्याविना राहू नका
देवाला नवस करून कोंबडी-बकरी मारु नका
आई-बापांची सेवा करा
कर्ज काढून दिवसवारे करू नका
शिवाशिव पाळू नका
दारू पिऊ नका
देवाचे भजन केल्याशिवाय राहू नका’
त्यांनी देशाला दिलेला हा संदेश वैज्ञानिक युगातील पिढीला देण्याचे व्रत संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती अध्यापन केंद्रामार्फत अभिरुची कला व क्रीडा मंदिराच्या कलावंतांनी स्वीकारले आहे. त्यांचा हा ४८ वा प्रयोग होता. गाडगेबाबांची कविता प्रा. माणिक देशमुख यांनी हुबेहुब साकारली.
या नाटकाचे दिग्दर्शन एम.टी. देशमुख यांनी केले. तर अ‍ॅड. रसिका बडवेकर देशमुख, रविशंकर संगेकर, शिल्पा ढोक, स्वपनील शेळके, अभिजित देशमुख, गजानन संगेकर, प्रकाश गिरणकर, प्रियंका राजनेकर यांनी उत्कृष्ट अभिनय साकारून प्रेक्षकांना जुन्या काळात नेले.

Web Title: Gopala ... Gopala ... Devkinainan Gopalala ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.