रेती माफियांकडून ६.७४ कोटींचा माल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST2020-07-17T05:00:00+5:302020-07-17T05:00:14+5:30

जिल्हा पोलीस विभागामार्फत जिल्ह्यातील अवैध रेती वाहतूक मोडीस काढण्याच्या दृष्टीने गुन्हे नोंद करण्यासोबतच महसूली कारवाई करण्यात येत आहे. अवैध रेती वाहतूक प्रकरणातील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा व त्यांच्या वाहतुकीच्या वेळेचा अभ्यास करून पोलीस अधीक्षकांनी विशेष पथकामार्फत तसेच स्थानिक पोलीस ठाणे स्तरावर चालू वर्षात १०३ गुन्हे दाखल करविले आहेत. त्यांच्याकडून सहा कोटी ७४ लाख ५७ हजार ४०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

Goods worth Rs 6.74 crore seized from sand mafia | रेती माफियांकडून ६.७४ कोटींचा माल जप्त

रेती माफियांकडून ६.७४ कोटींचा माल जप्त

ठळक मुद्देजिल्हा पोलिसांची कारवाई : १०३ गुन्ह्यात १८५ जणांना केले अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रेती घाटांचा लिलाव न झाल्यामुळे गरज पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होत आहे. अशात रेतीची चोरी करणाऱ्यांवर साडे सहा महिन्यांत १०३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात १८५ आरोपींना रेती चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
या रेती माफियांकडून जिल्हा पोलिसांनी सहा कोटी ७४ लाख ५७ हजार ४०० रूपयांचा माल जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी दिली आहे.
जिल्हा पोलीस विभागामार्फत जिल्ह्यातील अवैध रेती वाहतूक मोडीस काढण्याच्या दृष्टीने गुन्हे नोंद करण्यासोबतच महसूली कारवाई करण्यात येत आहे. अवैध रेती वाहतूक प्रकरणातील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा व त्यांच्या वाहतुकीच्या वेळेचा अभ्यास करून पोलीस अधीक्षकांनी विशेष पथकामार्फत तसेच स्थानिक पोलीस ठाणे स्तरावर चालू वर्षात १०३ गुन्हे दाखल करविले आहेत. त्यांच्याकडून सहा कोटी ७४ लाख ५७ हजार ४०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
रेती चोरून नेणारे ट्रॅक्टर चालक आपल्यावर कारवाई होऊ नये तसेच आपण पोलीस किंवा महसूल विभागाच्या हातात लागू नये यासाठी आपले वाहन भरधाव वेगाने हाकून रेती चोरी करतात. परंतु भरधाव वेगात वाहन चालविण्याच्या नादात मोठ्या प्रमाणात अपघात होतात. या अपघातांमध्ये अनेकांचा नाहक बळी जातो.
हे प्रकार घडू नयेत व रेती चोरून नेणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करता यावी यासाठी पोलिसांनी काही ठिकाणी रेती घाटाजवळ वाहतूक मार्गावर चर खोदून ठेवले आहे. यातून वाहतुकीस अडथळा निर्माण केला जातोे.

घाट लिलाव न झाल्यानेच होते चोरी
जिल्ह्यातील रेती घाटांचा लिलावच न झाल्याने घरकुलांचे काम कसे करावे हा प्रश्न लोकांपुढे आहे. आपल्या घराचे काम पूर्ण करण्याकरिता रेतीसाठी अव्वाचे सव्वा पैसे मोजण्याची तयारी लोकांची दिसून येते. त्यामुळे अधिक नफा कमविण्यासाठी रेती माफीयांकडून अवैधरित्या रेतीचा उपसा केला जातो. परिणामी यात अनेक महसूल अधिकाऱ्यांचे हात ओले होतात. परिणामी कारवाई झालीच तर थातूर- मातूर केली जाते. जिल्हा प्रशासनाने यंदा रेतीच्या घाटाचे लिलाव न केल्यामुळे कोट्यवधीचा महसूल बुडाला आहे. घाट लिलाव झाले नाही त्यामुळे रेती चोरीचे प्रमाण वाढले. परिणामी चोरीच्या रेतीचे दरही गगणाला भिडले आहेत.

रस्त्यांची वाताहत
रेती चोरांकडून कच्च्या रस्त्यानेही जड वाहतूक केली जाते. परिणामी ग्रामीण भागातील रस्त्यांवर मोठे खड्डे पडतात. एक खड्डा वाचविण्याच्या नादात आपला तोल दुसऱ्या खड्यात जातो. परिणामी दुचाकी चालकांचेही त्या रस्त्याने जातांना अपघात होतात. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेती अवैधरित्या वाहून नेली जात आहे. पावसाळा सुरू झाला असला तरी जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस न आल्यामुळे आताही रेती चोरी सुरूच आहे.

Web Title: Goods worth Rs 6.74 crore seized from sand mafia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.