निकृष्ट कामांना चांगुलपणाचा मुलामा
By Admin | Updated: June 4, 2015 00:47 IST2015-06-04T00:47:18+5:302015-06-04T00:47:18+5:30
गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या साठवण बंधारे व तलावांच्या डागडुजीच्या ८८ कोटींच्या कामांमधील गैरप्रकाराची चौकशी तीन सदस्यीय समितीने केली.

निकृष्ट कामांना चांगुलपणाचा मुलामा
गोंदिया : गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या साठवण बंधारे व तलावांच्या डागडुजीच्या ८८ कोटींच्या कामांमधील गैरप्रकाराची चौकशी तीन सदस्यीय समितीने केली. नागपूर येथील अधीक्षक अभियंत्यांच्या आदेशाने चंद्रपूर व नागपूर येथील अधिकाऱ्यांनी ही चौकशी केली. मात्र या समितीने ‘आॅल ईज वेल’ दाखवत झालेल्या गैरप्रकारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला आहे.
ज्या कामांबाबत बोलताना स्थानिक स्तरावरील अधिकारी आधी स्पष्टपणे काही सांगण्यास तयार नव्हते त्यांच्यात आता या समितीच्या दौऱ्यानंतर आत्मविश्वास बळावल्याचे दिसून येत आहे. सर्वकाही ठिकठाक झाल्याचा आव आणत ते कुठेच काही गैरप्रकार नसल्याचे सांगत असले तरी निकृष्ट कामांना चांगूलपणाचा मुलामा देण्यासाठी स्थानिक अधिकारी व कंत्राटदारांना बरीच कसरत करावी लागल्याची चर्चा आहे.
जिल्ह्यातील गोंदिया, सालेकसा, तिरोडा, अर्जुनी मोरगाव तालुक्यांमध्ये करण्यात आलेली ८८ कोटींची साठवण बंधाऱ्यांची कामे अधिकारी आणि कंत्राटदारांनी साटेलोटे करून पूर्ण केली. यातील अनेक कामे अंदाजपत्रक दराच्या १८ ते २० टक्के अधिक दराने वाटली असून झालेल्या कामांचा दर्जाही अत्यंत निकृष्ट आहे. त्यामुळे या कामात कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
वर्ष २०१३-१३ यादरम्यान गोंदियासह भंडारा जिल्ह्यात ही कोट्यवधीची जलसंधारणाची कामे वाटण्यात आली. गोंदियातील लघुसिंचन विभागाचे (जलसंधारण) कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता (श्रेणी-१) यांच्या देखरेखीत झालेल्या निविदा प्रक्रिया व कामे वाटपाच्या प्रक्रियेपासून ही कामे वादग्रस्त ठरली आहेत. वाटप झालेली बहुतांश कामे अंदाजपत्रकापेक्षा जास्त किमतीत वाटण्यात आली. त्यातही कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असताना ती कामे चांगली झाल्याचे दाखवत झालेल्या कामांची बिले काढण्यात आली. पिंडकेपार १ बंधाऱ्याचे काम केवळ खड्डा खोदून बंद करण्यात आले तर पिंडकेपार २ बंधाऱ्याच्या कामात फक्त पायवा बांधला असताना १६ लाखांचे बिल चुकते करण्यात आले. वास्तविक या कामावरील प्रत्यक्ष खर्च ५ लाखांपेक्षाही कमी आहे. तरीही कामाची कोणतीही गुणवत्ता न तपासता या कामाचे बिल चुकते करण्यात आले. या बंधाऱ्याची उंची पुरेशी नसल्यामुळे नाल्यात पाण्याचा साठा होतच नाही.
जोशीटोला येथील मामा तलाव, मानाकुही लघुपाटबंधारे तलाव आणि धनसुवा येथील कामांची निविदाच काढण्यात आली नाही. हे काम श्रमिक संस्था किंवा सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याला न देता आपल्या विशेष मर्जीतील ठेकेदाराच्या नावाने करारनामा करून काम देण्यात आले. २०१४-१५ मध्ये लघुपाटबंधारे विभागाच्या (जि.प.) उपविभाग सालेकसाद्वारा म.ग्रा.रो.ह.योमधून तिसऱ्यांदा डागडुजीचे काम करण्यात आले. वारंवार एकाच कामावर ज्या पद्धतीने पैसे लावले जात आहे त्यावरून हे काम किती निकृष्ट होत आहे याची कल्पना येते.
याचप्रमाणे झाडुटोला, बेलाटी, गिरोला येथे साठवण बंधाऱ्याचे काम अन्य विभागांनी केल्यामुळे ही कामे रद्द करण्याची शिफारस सहायक अभियंता सोनिया जाधव यांनी केली होती. मात्र नंतर जबरदस्तीने कार्यकारी अभियंता व ठेकेदारांना गटवून ही कामे आवश्यकता नसताना दुसऱ्या ठिकाणी थातूरमातूर करण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी)