गोंदिया रेल्वे स्थानकावर आता ‘कुलिंग सिस्टिम’
By Admin | Updated: February 13, 2015 01:14 IST2015-02-13T01:14:34+5:302015-02-13T01:14:34+5:30
उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्याचा पारा ४७ अंशापर्यंत पोहोचतो. त्यामुळे प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अंगाची लाही-लाही होते.

गोंदिया रेल्वे स्थानकावर आता ‘कुलिंग सिस्टिम’
गोंदिया : उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्याचा पारा ४७ अंशापर्यंत पोहोचतो. त्यामुळे प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अंगाची लाही-लाही होते. या समस्येचे निवारण करण्यासाठी ५० लाख रूपयांच्या कुलिंग सिस्टिमला मंजुरी देण्यात आली आहे. बुधवार (दि.११)पासून ही प्रणाली गोंदियाच्या रेल्वे स्थानकावर सुरू करण्यात आली आहे.
प्रवाशांना सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने रेल्वे स्थानक प्रशासनाने सुरूवात केली आहे. उन्हाळ्यात ४८ अंशापर्यंत पोहोचलेला तापमान २५ ते ३० अंशापर्यंत कूलिंग सिस्टिमुळे आणण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकातील प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांनाही गारवा मिळणार आहे. सदर प्रणालीचे उद्घाटन खा. नाना पटोले यांच्या हस्ते डीआरएम आलोक बंसल यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी अमित सैनी उपस्थित होते.
गोंदियाचे रेल्वे स्थानक अ श्रेणीत असून वर्षाकाठी सहा कोटींचा महसूल या स्थानकातून प्राप्त होतो. मध्यवर्ती व महत्त्वाचे स्थानक असल्याचा बहुमानही या स्थानकाला आहे. येथून मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि चंद्रपूरच्या दिशेने धावणाऱ्या गाड्यांतून हजारो प्रवाशी प्रवास करतात. प्रवाशांना अत्यधिक सुविधा पुरविण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याने मागील दोन वर्षांपासून स्थानकाच्या सौंदर्यात भर पडत आहे. फलाटांची संख्यासुद्धा वाढली आहे.
यापैकी एक सुविधा म्हणजे कूलिंग सिस्टिम आहे. उष्णतेमुळे उन्हाळ्यात प्रवाशांचे हाल होवू नये, यासाठी ५० लाख रूपयांच्या खर्चातून कूलिंग सिस्टिम सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक फलाटावर असलेल्या पंख्यांना थंड पाण्याचे पाईप जोडण्यात आले आहेत.
पंखे सुरू झाल्यानंतर फलाटावर गाडी येण्याच्या अर्धा तास पूर्वीपासून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कूलर किंवा एसीसमोर बसल्याच्या गारव्याची अनुभूती मिळणार आहे. ही थंड हवा प्रवाशांना फलाट आणि तिकीट घरात मिळणार आहे. त्यासाठी स्थानकावर पाणी शुद्धीकरण यंत्रदेखील बसविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
स्थानकाला ‘हायफाय’ करण्याचा मानस
अनेक योजनांच्या माध्यमातून गोंदिया स्थानकाला ‘हायफाय’ करण्याचा मानस खा.नाना पटोले यांनी व्यक्त केला. तसेच होम प्लॅटफार्मवरून नागपूरकडे जाणाऱ्या गाड्या सोडण्याकरिता अतिरिक्त लाईन तयार करण्यासाठी पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती देणारे फलक रेल्वे स्थानक परिसरात नि:शुल्क लावण्याची सुविधा करण्यात येईल, असे डीआरएम बंसल म्हणाले.