गोंदिया-इंदूर-बंगळूर प्रवासी विमानसेवेचे उड्डाण ; आठवड्यातून 'हे' तीन दिवस करता येणार प्रवास

By अंकुश गुंडावार | Updated: September 16, 2025 19:55 IST2025-09-16T19:53:21+5:302025-09-16T19:55:42+5:30

Gondia : गोंदिया-इंदूर-बंगळूर प्रवासी विमानसेवेला मंगळवारपासून सुरुवात झाली. मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील दुबे कुटुंब हे या सेवेचा लाभ घेणारे पहिले प्रवासी ठरले.

Gondia-Indore-Bangalore passenger flight; Travel will be possible three days a week | गोंदिया-इंदूर-बंगळूर प्रवासी विमानसेवेचे उड्डाण ; आठवड्यातून 'हे' तीन दिवस करता येणार प्रवास

Gondia-Indore-Bangalore passenger flight; Travel will be possible three days a week

गोंदिया : स्टार एअर कंपनीने मंगळवारपासून (दि.१६) तालुक्यातील बिरसी विमानतळावरून गोंदिया-इंदूर-बंगळूर प्रवासी विमानसेवेला सुरुवात केली. पहिल्याच दिवशी गोंदिया विमानतळावरून इंदूरसाठी ५३ प्रवाशांनी उड्डाण घेतले. इंदूरहून गोंदिया विमानतळावर आलेल्या प्रवाशांचेसुद्धा यावेळी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. बिरसी विमानतळावरून गोंदिया-इंदूर-बंगळूर प्रवासी विमानसेवेला प्रारंभ झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

गोंदिया तालुक्यातील बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ आहे. सध्या या विमानतळावरून गोंदिया-हैदराबाद-तिरुपती या मार्गावर प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू होती. खा. प्रफुल्ल पटेल यांच्या यशस्वी पाठपुराव्यानंतर स्टार एअर कंपनीने गोंदिया-इंदूर-बंगळूर या मार्गावर प्रवासी विमानसेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर स्टार एअरची आठवड्यातून मंगळवार, बुधवार व शुक्रवार तीन या मार्गांवर या विमानतळावरून ही सेवा सुरू राहणार आहे. मंगळवारी (दि.१६) या मार्गावरील प्रवासी विमान वाहतूक सेवेला सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी आ. राजेंद्र जैन, बिरसी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक गिरीशचंद्र वर्मा, स्टार एअर कंपनीचे सुनील साबळे व अधिकारी उपस्थित होते. यावेळी इंदूरहून बिरसी विमानतळावर दाखल झालेल्या प्रवाशांचे उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच गोंदियाहून पहिल्याच दिवशी इंदूरला जाणाऱ्या सर्व ५३ प्रवाशांचे पुष्पगुच्छ व बोर्डिंग पास देऊन स्वागत करण्यात आले.

आरंभ केला सेवेचा आरंभ

गोंदिया-इंदूर-बंगळूर प्रवासी विमानसेवेला मंगळवारपासून सुरुवात झाली. मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील दुबे कुटुंब हे या सेवेचा लाभ घेणारे पहिले प्रवासी ठरले. आदर्श दुबे यांनी त्यांचा एक वर्षाचा मुलगा आरंभच्या नावावे गोंदिया-बंगळूर विमानसेवेचे पहिले तिकीट बुक केले. त्यामुळे गोंदिया-इंदूर-बंगळूर विमानसेवेचा आरंभ आरंभने केला.

असे आहे वेळापत्रक

बिरसी विमानतळावरून स्टार एअरलाईन्सची विमानसेवा आठवड्यातून मंगळवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस गोंदिया-इंदूर-बंगळूर सेवा देणार आहे. इंदूरहून सायंकाळी ५ वाजता उड्डाण भरून गोंदिया येथे सायंकाळी ५:५५ पोहोचेल. तसेच बिरसी विमानतळावरून सायंकाळी ६:२५ वाजता इंदूरकरिता व इंदूरवरून बंगळूरकरिता सायंकाळी ७:५० वाजता उड्डाण भरेल.

मुंबई, पुणे, दिल्ली विमानसेवा लवकरच सुरू होणार

खा. प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने इंडिगो कंपनीने गोंदिया-हैदराबाद-तिरुपती या मार्गावर विमानसेवा सुरू केली. त्यानंतर त्यांच्याच पाठपुराव्याने गोंदिया-इंदूर-बंगळूर या मार्गावरील प्रवासी विमानसेवेला सुरुवात झाली. लवकरच मुंबई, पुणे व दिल्लीकरिता नियमित विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. प्रवासी विमानसेवेमुळे लगतच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यांतील प्रवाशांना सोयीचे होणार असल्याचे माजी आ. राजेंद्र जैन यांनी या सेवेच्या शुभारंभाप्रसंगी सांगितले.
 

Web Title: Gondia-Indore-Bangalore passenger flight; Travel will be possible three days a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.