गोंदिया शहराला भोवले खड्डे
By Admin | Updated: September 13, 2015 01:41 IST2015-09-13T01:41:52+5:302015-09-13T01:41:52+5:30
गोंदिया शहरात तुम्ही एसटीने किंवा रेल्वेने एवढेच काय आपल्या खाजगी वाहनानेही प्रवेश केल्यास सर्व प्रथम तुमचे स्वागत करतात ते येथील खड्डे.

गोंदिया शहराला भोवले खड्डे
कधी पाईपलाईन तर कधी केबलसाठी खोदकाम : शहरवासीयांच्या नशिबी फक्त दचकेच
गोंदिया : गोंदिया शहरात तुम्ही एसटीने किंवा रेल्वेने एवढेच काय आपल्या खाजगी वाहनानेही प्रवेश केल्यास सर्व प्रथम तुमचे स्वागत करतात ते येथील खड्डे. आजच्या स्थितीत शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. उखडलेल्या रस्त्यांमुळे शिवाय जागोजागी खोदून ठेवलेल्या खड्यांमुळे शहरवासीयांच्या नशिबी येत आहेत ते खड्डे व त्या पासूनचे दचके . कधी पाईन लाईनसाठी तर कधी केबलसाठी हे खड्ये खोदण्यात येत आहेत. यातूनच गोंदिया शहराला खड्डे भोवल्याचे दिसून येत आहे.
राज्यच काय, तर देशपातळीवरील दिग्गज नेत्यांचे जन्मगाव असलेल्या एवढेच नव्हे तर व्यापारासाठी ‘मिनी मुंबई’ म्हणून ख्यातनाम असलेल्या गोंदिया शहराचे राजकारणातही तेवढेच महत्व आहे. गोंदिया शहर यामुळेच आपली एक खास ओळख टिकवून ठेवत आहे. मात्र गोंदिया शहराची आजची स्थिती बघितल्यास शहरात गुळगुळीत रस्ता शोधण्याची स्पर्धा घेण्याची वेळ आली आहे. शहरातील एकही रस्ता उखडलेला नाही असे म्हणता येणार नाही. यामुळेच एखाद्या गावापेक्षाही बत्तर स्थिती शहराची झाली आहे.
एकीकडे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. तर त्यात अधिकची भर अशी की, कोणत्या ना कोणत्या कामासाठी रस्ते खोदल्या जात आहेत. यात दुरूस्त करण्यात आलेल्या रस्त्यांचीही पर्वा केली जात नसल्याचे दिसते. कधी वाढीव पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन टाकण्यासाठी खड्डे खोदले जात आहेत. तर कधी अंडरग्राऊंड केबलच्या कामासाठी रस्त्यांवर खड्डे खोदण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. सध्या शहरातील बाजार भागात बघितल्यास अंडरग्राऊंड केबलसाठी ठिकठिकाणी खड्डे खोदण्यात आल्याचे दिसून येत आहे.
नेहरू चौकातून पुढे आल्यास स्टेडियम परिसरात, त्यानंतर खोजा मस्जीद चौकात, पुढे जैन मंदिर समोर अंडरग्राऊंड केबलसाठी खड्डे खोदण्यात आले आहे. केबलच्या या कामासाठी मात्र चांगले रस्ते खोदले जात आहेत. अगोदरच शहरातील रस्त्यांची वाताहत झालेली असताना त्यात हे खड्डे अधिकची भर घालत आहे. याचा त्रास मात्र सर्व सामान्य गोंदियावासी भोगत असून आपल्या पावली त्यांना दचके सहन करावे लागत आहे. (शहर प्रतिनिधी)
सिमेंट रस्त्यांवर डांबरीकरणाचा प्रयोग फसला
शहरातील बाजार भागात इंग्रजांच्या काळातील रस्ते असल्याचे बोलले होते. या सिमेंटरस्त्यांवर पालिके ने डांबरीकरणाचा प्रयोग केला. वर्षभरापूर्वी करण्यात आलेला हा प्रयोग मात्र सपशेल फसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याचे कारण असे की, बाजारभागातील हे रस्ते आता उखडले आहेत. रस्त्यांवरील डांबरीकरण उखडले असून आतील सिमेंट रस्ते दिसू लागले आहेत. जागोजागी सिमेंट उखडत चालले असून तेथे खड्डे पडत आहेत. एकंदर सिमेंटीकरणावर करण्यात आलेला लाखो रूपयांचा खर्च पाण्यात गेल्याचे बोलले जात आहे.
मुख्य चौकांची स्थिती दयनीय
शहरातील नेहरू चौक, आंबेडकर चौक व जयस्तंभ चौक हे तीन मुख्य चौक असून राज्य मार्गावर आहेत. सततची वर्दळ असलेल्या या मार्ग आता कसे असायला हवे ते सांगायची गरज नाही. मात्र गोंदिया शहरातील हे तीन मुख्य चौक आपल्या दैनावस्थेवर आज रडत आहेत. या तिन्ही चौकातील रस्ते उखडले असून येथून आता ये-जा करणे नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत.
पालिका प्रशासन व बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
खड्यात गेलेल्या गोंदिया शहरातील पालिका प्रशासन व बांधकाम विभागाचे या सर्व प्रकारांकडे दुर्लक्ष असल्याचे दिसते. शहराच्या आतील रस्ते पालिका प्रशासनाच्या अखत्यारीत येतात तर राज्य मार्गावरील रस्ते बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतात. या दोन्ही विभागांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास शहरवासीयांच्या भाग्यातील हे खड्डे भरता येतील.