चोरट्यांचे टार्गेट आता शेळ्या अन् बकऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:16 IST2021-01-13T05:16:25+5:302021-01-13T05:16:25+5:30
बाराभाटी : जवळच्या डोंगरगाव-कवठा येथे रविवारी(दि.१०) रात्री २ वाजताच्या सुमारास विश्वनाथ मुंगमोडे यांच्या गोठ्यातून ३९ चोरी गेल्याची घटना घडली. ...

चोरट्यांचे टार्गेट आता शेळ्या अन् बकऱ्या
बाराभाटी : जवळच्या डोंगरगाव-कवठा येथे रविवारी(दि.१०) रात्री २ वाजताच्या सुमारास विश्वनाथ मुंगमोडे यांच्या गोठ्यातून ३९ चोरी गेल्याची घटना घडली. गावापासून २०० मीटर अंतरावर एका टिप्पर डांबून शेळ्या चोरी करून नेल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे मुंगमोडे यांचे सव्वा दोन लाख रुपयांचे नुकसान झाले तर घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार मुंगमोडे परिवाराच्या शेळ्या ह्या रस्त्यालगत असलेला गोठ्यात ५० ते ६० शेळ्या बांधून ठेवल्या होत्या.त्यापैकी ९ बकरे आणि ३० शेळ्या चोरट्यांनी चोरून नेल्या. चोरट्यांनी एका टिप्परमध्ये या शेळ्यांना डांबून नेल्याचे काही गावकऱ्यांनी पाहिल्याचे सांगितले जाते. शेळ्यांची चोरी करताना आवाज होऊ नये यासाठी शेळ्यांवर स्प्रेने फवारणी करून त्यांची चोरी करण्याचा अंदाज पशुवैद्यकीय विभागाने व्यक्त केला आहे. मुंगमोडे यांनी चोरीची तक्रार नवेगावबांध पोलीस स्टेशन येथे नोंदविली असून तपास पोलीस निरीक्षक जनार्दन हेडकेवार, पोलीस शिपाई शब्बीर शेख करत आहेत.
....
शेळ्या घेण्यासाठी येऊन केला जातो सर्वे
शेळ्या विकत घेण्याच्या बहाण्याने दोन अज्ञात नागरिक गावागावांत मोटारसायकलने येऊन पाहून जातात. त्यानंतर रात्रीच शेळ्याच चोरी होतात, असा प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू आहे. सालेकसा, देवरी, डुग्गीपार, वांगी, पिंडकेपार या ठिकाणाहून शेळ्या चोरी झाल्याची माहिती आहे.
......
शेळ्या विकत घेण्याच्या उद्देशाने दोघे आले व चौकशी करून परत गेले. त्याच रात्री आमच्या गोठ्यातून शेळ्यांची चोरी झाली.
- अक्षय विश्वनाथ मुंगमोडे.
......
शेळीपालन करूनच माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, चोरट्यांनी शेळ्या चोरून नेल्याने माझे सव्वा दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.
- विश्वनाथ निताराम मुंगमोडे,शेळीपालक, डोंगरगाव.
.....