योग्य सन्मान द्या, अन्यथा...
By Admin | Updated: February 3, 2015 22:58 IST2015-02-03T22:58:49+5:302015-02-03T22:58:49+5:30
भारतीय जनता पक्षातील असंतुष्ट गटाने जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवनकर यांच्या नेतृत्वात १ फेबु्रवारीला घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत वारंवार पक्षाकडून मिळणाऱ्या

योग्य सन्मान द्या, अन्यथा...
असंतुष्टांचा इशारा : भाजप कार्यकर्त्यांची स्वपक्षावरच नाराजी
आमगाव : भारतीय जनता पक्षातील असंतुष्ट गटाने जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवनकर यांच्या नेतृत्वात १ फेबु्रवारीला घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत वारंवार पक्षाकडून मिळणाऱ्या वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षातील नेत्यांविरुद्ध ताशेरे ओढताना योग्य सन्मान राखा, अन्यथा वेगळा विचार केला जाईल, असा इशारा अनेकांनी दिला.
आमगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात गटागटाचे राजकारण होत असल्याने भाजपात असंतोष धुसफुसत आहे. आमगाव तालुका भाजपाच्या बैठकीत शिवणकर गटाच्या नेत्यांना डावलल्याचे कारण पुढे करुन समर्थकांनी रविवारी सभा घेतली. सरस्वती विद्यालयात कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण करून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या शक्तिप्रदर्शनात जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, जिल्हा परिषद सदस्य तुंडीलाल कटरे, छोटू बहेकार, संगीता दोनोडे, मुक्तानंद पटले, पंचायत समिती सदस्य रज्जू भक्तवर्ती उपस्थित होते.
यावेळी विजय शिवणकर यांनी पक्षाकडून योग्य वागणुक मिळत असल्याचे कारण पुढे करीत आपण पक्षाकरीता सतत कार्यशील असल्याचे सांगितले. पक्षात नेहमी डावलण्याची भूमिका आता खूप झाली आहे. आपण काही चुकीचे केले असे वाटत असल्यास पक्षाने बाहेर काढण्याचा निर्णय का घेतला नाही, असा उलट प्रश्न करुन पक्षाने शिस्तीने वागावे, अन्यथा वेगळा विचार केला जाईल, असा इशाराही दिला.
यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आक्रोश व्यक्त करीत पक्ष सोडण्याची भावना व्यक्त केली.
या बैठकीला विविध भागातून कार्यकर्ते उपस्थित होते. प्रामुख्याने आमगाव, सालेकसा व देवरी तालुक्यातील असंतुष्ट कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. परंतु अनेक पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांनी या शक्तिप्रदर्शनापासून स्वत:ला दूर ठेवल्याचे दिसून आले. (शहर प्रतिनिधी)