घरकुल मंजुरीचे अधिकार ग्रामपंचायतला द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 22:29 IST2019-08-16T22:28:23+5:302019-08-16T22:29:05+5:30
घरकुलांना मंजुरी देण्याची प्रक्रिया ही पंचायत समिती स्तरावरुन पूर्ण केली जाते. मात्र ग्रामपंचायत अंतर्गत प्रस्ताव पाठवून सुध्दा वर्ष वर्षभर घरकुल मंजूर केले जात नाही. मंजुरी दिली तर त्याचे देयके वेळेवर दिली जात नाही.

घरकुल मंजुरीचे अधिकार ग्रामपंचायतला द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : घरकुलांना मंजुरी देण्याची प्रक्रिया ही पंचायत समिती स्तरावरुन पूर्ण केली जाते. मात्र ग्रामपंचायत अंतर्गत प्रस्ताव पाठवून सुध्दा वर्ष वर्षभर घरकुल मंजूर केले जात नाही. मंजुरी दिली तर त्याचे देयके वेळेवर दिली जात नाही. लाभार्थी पंचायत समितीच्या पायऱ्या झिजवून थकून जातात.त्यामुळे घरकुल मंजुरीचे अधिकार ग्रामपंचायत दिल्यास ही प्रक्रिया जलद गतीने राबविण्यास मदत होईल. शासनाने याचा विचार करुन घरकुल मंजुरीचे अधिकार ग्रामपंचायतला द्यावे अशी मागणी शासनाकडे सरपंच पुष्पमाला बडोले यांनी केली आहे.
ग्रामीण भागात आज ही ५० टक्के घरे ही मातीने बांधलेली आहे.सततच्या पावसाने भिंती ओल्या होतात, जीर्ण झालेली घरं पडतात, परिणामी कधी कधी प्राणहानी तर कधी दुखापत होऊन घर पडल्याने त्यांना बेघर होऊन इतर ठिकाणी आश्रय घ्यावा लागतो.
त्यामुळे बरेच लाभार्थी घरकुल मंजूर करुन घेण्यासाठी सरपंच आणि सदस्यांकडे येतात. मात्र ग्रामपंचायतच्या हातात केवळ प्रस्ताव पाठविणे ऐवढेच असते. घरकुल मंजुरीचे अधिकार हे पंचायत समिती आणि जि.प.ला आहे. मात्र त्यांना गावातील वास्तविक परिस्थिती माहिती नसते, शिवाय कुणाला घरकुलाची गरज आहे अथवा नाही याची सुध्दा कल्पना नसते.त्यामुळे अनेकदा गरजू लाभार्थ्यांवर अन्याय होतो.शिवाय लाभार्थ्यांना वर्षभर त्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे ही सर्व परिस्थिती लक्षात घेता घरकुल मंजुरीचे अधिकार हे ग्रामपंचायतला देण्यात यावे अशी मागणी सरपंच पुष्पमाला बडोले यांनी केली आहे.