सहापैकी पाच पुरस्कारांवर मुलींची बाजी

By Admin | Updated: January 12, 2017 00:14 IST2017-01-12T00:14:19+5:302017-01-12T00:14:19+5:30

जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत सहापैकी पाच पुरस्कारांवर मुलींनी बाजी मारली.

Girls win five out of six awards | सहापैकी पाच पुरस्कारांवर मुलींची बाजी

सहापैकी पाच पुरस्कारांवर मुलींची बाजी

सुनिता, नेहा ठरल्या मानकरी : जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा
गोंदिया : जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत सहापैकी पाच पुरस्कारांवर मुलींनी बाजी मारली. यात वरिष्ठ महाविद्यालयीन गटात गोंदिया येथील एस.एस. गर्ल्स महाविद्यालयाची विद्यार्थिनी सुनिता सूर्यप्रकाश चौधरी आणि कनिष्ठ महाविद्यालय गटात सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी-मोरगावची विद्यार्थिनी नेहा भास्कर कापगते प्रथम आली. दोन्ही विद्यार्थिनींना प्रत्येकी ११ हजार रूपयांचा धनादेश, करंडक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. त्यांची राज्यस्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्व. वसंतराव नाईक जिल्हा परिषद सभागृहात मंगळवार (दि.१०) जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा पार पडली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून दीप प्रज्ज्वलनाने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख, स्पर्धा परीक्षक रासेयो जिल्हा समन्वयक प्रा. बबन मेश्राम, प्रा.डॉ. चंद्रकुमार राहुले, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, क्रीडा अधिकारी अनिल निमगडे, शिक्षण विस्तार अधिकारी ए.के. खडसे उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, भावी पिढीचे तुम्ही आधारस्तंभ आहात. आपले विचार आणि वाणी धारदार करा, असे आवाहन करीत ते स्पर्धक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत पुढे म्हणाले, घरचा पुरूष शौचालयाची व्यवस्था करू शकत नाही म्हणून महिलांना बाहेर बसावे लागत आहे. केवळ शौचालय बांधूनच स्वच्छतेची सुरूवात होत नाही. तर सर्वकष स्वच्छतेवर लक्ष द्या. केवळ स्पर्धा म्हणूनच नव्हे, तर गावातील स्वच्छतादूत म्हणून सुद्धा सर्व युवकांनी कार्य करून आपले गाव हागणदारीमुक्त करावे, असेही ते याप्रसंगी म्हणाले.
कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय अशा दोन गटात घेण्यात आलेल्या स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम व द्वितीय आलेले एकूण २९ विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी झाले. कनिष्ठ महाविद्यालयीन गटात मनोहरभाई पटेल कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी किर्ती अंकुश् हटवार द्वितीय, तर याच महाविद्यालयाचा विद्यार्थी हेमकृष्ण प्रेमलाल पिसदे तृतीय आला. वरिष्ठ महाविद्यालय गटातून एम.बी. पटेल महाविद्यालय सालेकसाची विद्यार्थिनी रितू आनंद पटले द्वितीय तर जगत महाविद्यालय गोरेगावची विद्यार्थिनी ममता डिलचंद पटले तृतीय आली.
द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी सात हजार रूपये तर तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रूपयांचे धनादेश, करंडक, प्रमाणपत्र देवून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषा मेंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख यांच्या हस्ते गौरविण्यात आले. जिल्हास्तरावर प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना शासनातर्फे साधन व्यक्तीचा दर्जा बहाल करण्यात आलेला आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धेत मुलींनीच बाजी मारली. सहापैकी पाच पुरस्कार मुलींनीच पटकाविले. विशेष म्हणजे वरिष्ठ महाविद्यालय गटातील विजेत्यांमध्ये सर्व मुलींचाच समावेश आहे.
सर्व विद्यार्थ्यांचे जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, उपाध्यक्ष रचना गहाणे, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती विमल नागपुरे, कृषी व पशूसंवर्धन सभापती छाया दसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख यांनी कौतुक केले. (प्रतिनिधी)

‘लाजमहाल’ कधी बनविणार?
जिल्हास्तरीय स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांना वाट मोकळी केली. बादशहा शहाजहानने आपल्या बायकोसाठी तिच्या मृत्यूनंतर ताजमहाल बांधला. तुम्ही आपल्या हयात असलेल्या बायकोसाठी, कमीत कमी तिच्या लज्जा रक्षणासाठी ‘लाजमहाल’ (शौचालय) कधी बनविणार, असा सवाल उपस्थित करून शौचालयाचे बांधकाम करून त्यांच्या वापराचे स्पर्धक विद्यार्थ्यांनी आवाहन केले.

Web Title: Girls win five out of six awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.