‘त्या’ २६ कोटींचा मार्ग मोकळा
By Admin | Updated: March 22, 2017 01:13 IST2017-03-22T01:13:18+5:302017-03-22T01:13:18+5:30
५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जमा झालेल्या नोटा ...

‘त्या’ २६ कोटींचा मार्ग मोकळा
जुन्या नोटा भरता येणार : जिल्हा बँकेचे टेंशन हलके, मात्र आदेशाची प्रतीक्षा
गोंदिया : ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जमा झालेल्या नोटा स्वीकरण्यावरील निर्बंध मागे घेण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तिजोरीत पडून असलेल्या २६ कोटींच्या जुन्या नोटांचा संबंधित बँकांच्या करंसी चेस्टमध्ये भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे जिल्हा बँकेचे टेंशन बरेच हलके झाले असले तरी अद्याप त्यांना त्या निर्णयाबाबतचे पत्र मिळालेले नाहीत.
केंद्र शासनाने नोव्हेंबर महिन्यात ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनबाद करण्याचा निर्णय घेतला. अचानक घेण्यात आलेल्या नोटाबंदीच्या या निर्णयामुळे अवघ्या देशातच खळबळ माजली होती. सुरूवातीच्या काळात नागरिकांना या नोटा भरण्यासाठी बँकांपुढे रांगा लावाव्या लागल्या होत्या. नव्या नोटा आल्याने एटीएम सेवा सुद्धा विस्कळीत झाली होती व पैसे काढणे आणि पैसे टाकणे ही एक डोकेदुखी ठरू लागली होती. यातच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर निर्बंध घालण्यात आले होते. त्यानुसार रद्द केलेल्या या नोटा बँकांद्वारे करंसी चेस्टमध्ये स्वीकारण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे या बँकांकडे मागील चार महिन्यांपासून नोटा पडून होत्या. याचा फटका मात्र सर्वसामान्य ग्राहक व प्रामुख्याने शेतकऱ्यांना बसत होता.
सर्वोच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँकेला या बँकांमधील खात्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रिझर्व्ह बँकेने राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेला तपासणीच्या सूचना दिल्या होत्या. मात्र नाबार्डकडून त्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात येत नसल्याने पुढील कारवाई थांबली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत व माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची नवी दिल्लीत भेट घेऊन जिल्हा बँकेवरील हे निर्बंध मागे घेण्याबद्दल चर्चा केली. यात जिल्हा बँकांची वस्तूस्थिती मांडत जिल्हा बँकांचे व्यवहार ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज व अन्य आर्थिक मदत मिळणे कठीण झाल्याचे चित्र स्पष्ट केले. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकांवरील निर्बंध मागे घेऊन त्यांच्याकडील रद्द करण्यात आलेल्या ५०० व १००० रूपयांच्या नोटा करंसी चेस्टमध्ये स्वीकारण्याचे ठरले. (शहर प्रतिनिधी)
व्याज भरण्याचा प्रश्न
नोटाबंदी होऊन आता चार महिन्यांचा काळ लोटला आहे. येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेकडील चलनातून बाद झालेल्या ५०० व १००० रूपयांच्या तब्बल २५ कोटी ४८ लाख १४ हजार ५०० रूपयांच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बॅँकेत जमा झाल्या नाहीत. त्यामुळे बँकेला दररोज २८ हजार रूपयांचे व्याज भरावे लागत आहे. गेल्या चार महिन्यांत असा एकूण ३३ लाख ६० हजार रूपयांचा भुर्दंड जिल्हा बँकेला बसला आहे. आता हे व्याज कोण भरून देणार? असा प्रश्न उभा झाला आहे.