विविध मुद्यांवर गाजली जि.प.ची सर्वसाधारण सभा
By Admin | Updated: August 13, 2014 23:57 IST2014-08-13T23:57:16+5:302014-08-13T23:57:16+5:30
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी जि.प. सभागृहात पार पडली. यावेळी क्षयरोग नियंत्रण सोसायटीअंतर्गत भरण्यात येणाऱ्या पर्यवेक्षक व तंत्रसहाय्यक पदाच्या भरती प्रक्रियेसह

विविध मुद्यांवर गाजली जि.प.ची सर्वसाधारण सभा
गोंदिया : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी जि.प. सभागृहात पार पडली. यावेळी क्षयरोग नियंत्रण सोसायटीअंतर्गत भरण्यात येणाऱ्या पर्यवेक्षक व तंत्रसहाय्यक पदाच्या भरती प्रक्रियेसह इतर अनेक मुद््यांवर काही सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
स्वत:च्या स्वार्थाकरिता स्थानिक जि.प. सदस्यांना डावलून गोंदिया पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अनावश्यक वापर करणे, हिवताप व डेंग्युवर नियंत्रण आणण्यात अपयशी ठरलेला आरोग्य विभाग, कृषी विभागांतर्गत अवाजवी दराने धान बियाण्यांची विक्री करणे, आठवीच्या विद्यार्थ्याना शिकविण्यासाठी शिक्षक नसणे अशा अनेक मुद्यांवर जिल्हा परिषद सदस्यांनी प्रश्नांचा भडीमार केला.
जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला मुख्य कार्यपालन अधिकारी डी.डी.शिंदे, सभापती कुसन घासले, प्रकाश गहाणे, सविता पुराम, मोरेश्वर कटरे उपस्थित होते.
दुपारी १ वाजता सुरू झालेल्या सभेत जि.प. सदस्य उमाकांत ढेगे यांनी क्षयरोग नियंत्रण सोसायटीची पदभरती रेंगाळल्याने सीईओ शिंदे यांच्यावर खापत फोडले. सोसायटीव्दारे १९ नोव्हेंबर २०१३ ला चार पर्यवेक्षक व तीन तंत्रसाहाय्यकाच्या पदांकरिता जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. या अंतर्गत १ हजार १४ बेरोजगारांचे अर्ज प्राप्त झाले. लोकसभा निवडणूक जवळ आल्याने पदभरतीची प्रक्रिया लांबली. सीईओंनी या भरतीचा निर्णय लवकरच घेण्यात येईल असे असल्याचे आश्वासन दिले. जि.प. सदस्य विनोद अग्रवाल यांनी शिक्षण विभागाच्या पदोन्नती कार्यशाळा वारंवार रद्द होत असल्याबद्दल खेद व्यक्त केला. जिल्ह्यात अनेक पदे रिक्त असून सहाय्यक शिक्षकांची पदोन्नती करणे हे शासनाचे धोरण आहे. मात्र, कार्यशाळा रेंगाळल्याने त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा प्रश्न उपस्थित केला.
गोरेगाव पं.स.च्या सभापती चित्रलेखा चौधरी यांनी त्यांच्याकरिता वाहन उपलब्ध नसल्याने अनेक कामे होत नसल्याचे सांगितले. यामुळे त्वरित वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी केली. जि.प. सदस्य नरेंद्र तुरकर यांनी गोंदिया पंचायत समितींतर्गत महिला व बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक महिला मेळावे घेतले जात आहेत. मात्र, या मेळाव्यात जि.प. सदस्यांना वगळण्यात येत असून एका विशिष्ट व्यक्तीकडून हे सर्व कार्यक्रम राबविण्यात आले. यामध्ये येणारा खर्च शासनाच्या तिजोरीतून झाला व मेळाव्याच्या नियोजनात सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा वापर करण्यात आला. अशाप्रकारे शासकीय निधीचा वापर करून स्थानिक लोकप्रतिनिधी जि.प. सदस्यांना वगळत असून अशा चुकीच्या प्रकारांना आळ घालण्यात यावा, अशी मागणी केली. यावर अध्यक्षांनी चौकशी करून अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
जि.प. सदस्य राजेश चांदेवार यांनी आरोग्य विभागाला चांगलेच धारेवर धरले. त्यांनी हिवताप विभागाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात व्यवस्थित फवारणी केली नाही. त्यामुळेच अनेकांना हिवताप व डेंग्युची लागण झाली असून नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हिवताप फवारणीचे पावडर भेसळयुक्त असून त्यांच्या चौकशीची मागणी केली. तसेच शिक्षण विभागाने जिल्ह्यातील अनेक शाळेत आठवीचे वर्ग सुरू केले. मात्र, त्यांना शिकविण्याकरिता शिक्षक नसल्याने ५ वी ते ७ वीचे शिक्षक त्यांना शिकवित आहेत. त्यामुळे विद्यार्थी कसे घडतील, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी चूक मान्य करीत लवकरच शिक्षकांची नेमणूक करण्याचे आश्वासन दिले.
जि.प. सदस्य मिलन राऊत यांनी बाजारात ६५० रुपयाला मिळणाऱ्या धान बियाण्याची बॅग जि.प.च्या कृषी विभागाच्या माध्यमातून ८४० ला खरेदी केली असून यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. यावर कृषी सभापती कटरे यांनी, असा कुठलाच प्रकार झाला नसून त्या बॅगची एमआरपी ९५० असल्याचे सांगितले. उमाकांत ढेंगे यांनी मानव विकासअंतर्गत ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थीनीसाठी सुरू असलेल्या सायकल वाटपासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. त्यांनी अर्जुनी/मोरगाव तालुक्यात सर्व खासगी शाळांमध्ये सायकल वाटप करण्यात आले. मात्र, जिल्हा परिषदेच्या बोंडगावदेवी व अर्जुनी/मोरगाव शाळेला का वगळण्यात आले, याची विचारणा केली. यासह अनेक मुद्यांवर याप्रसंगी चर्चा झाली. (जिल्हा प्रतिनिधी)