राजपत्रित वैद्यकीय अधिकार्यांचा मूक मोर्चा
By Admin | Updated: May 31, 2014 23:34 IST2014-05-31T23:34:17+5:302014-05-31T23:34:17+5:30
महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्यावतीने (अ)आपल्या विविध मागण्यांसाठी ३१ मे रोजी मूक मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

राजपत्रित वैद्यकीय अधिकार्यांचा मूक मोर्चा
गोंदिया : महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्यावतीने (अ)आपल्या विविध मागण्यांसाठी ३१ मे रोजी मूक मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
सेवा समावेशन झालेल्या वैद्यकीय अधिकार्यांना पूर्वलक्ष लाभ देण्यात आला नाही, राज्यातील वैद्यकीय अधिकार्यांना सहावा वेतन आयोग लागू झाला नाही, अस्थायी एमबीबीएस, बीएएमएस, बीडीएस वैद्यकीय अधिकार्यांना अद्याप स्थायी करण्यात आले नाही, केंद्र शासन व इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील वैद्यकीय अधिकार्यांना वेतन दिले जात नाही, कामाचे तास निश्चीत नाही. तसेच सेवानवृत्तीचे वय ५८ वरून ६२ वर्षे करण्यात आले नाही आदी मागण्यांना घेऊन संघटनेने धरणे आंदोलन केले.
तसेच १ जूनपासून वैद्यकीय अधिकारी आंदोलनात सहभागी होऊन कामांवर बहिष्कार टाकणार आहेत. २ जूनपासून आझाद मैदान येथे धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत.
क्षयरोग नियंत्रण कर्मचारी संघटनेच्यावतीने कर्मचार्यांना सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. एवढेच नव्हे तर २ जून पासून मॅग्मो (महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना) संघटनेच्या बेमुदत आंदोलनात क्षयरोग नियंत्रण कर्मचारी सहभागी होणार आहे. देताना संघटनेचे अध्यक्ष पवन वासनिक, उपाध्यक्ष योगिता अडसड, सचिव भोजेंद्र बोपचे, कोषाध्यक्ष अमित मंडल व अन्य उपस्थित होते.
सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ आरोग्य अधिकारी यांची शिखर संघटना मॅग्मो आहे. या संघटनेने २ जून पासून पुकारलेल्या कामबंद आंदोलनात सार्वजनिक आरोग्य विभागातील वाहन चालक कर्मचारी संघटना सहभाग घेणार आहे.
वाहन चालकांची कायम नेमणूक करण्यात यावी मागणीला या आंदोलनाच्या माध्यमातून उचलून धरले जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)