गार्डन व कॉन्फरन्स हॉलला लोकार्पणाची प्रतीक्षा
By Admin | Updated: February 9, 2015 23:15 IST2015-02-09T23:15:56+5:302015-02-09T23:15:56+5:30
येथील पर्यटन संकुल परिसरात सुमारे पाच वर्षापूर्वीच तयार केलेले गार्डन व कॉन्फरंस हॉल अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीतपणामुळे अजूनही लोकार्पणाच्या प्रतिक्षेत आहेत.

गार्डन व कॉन्फरन्स हॉलला लोकार्पणाची प्रतीक्षा
नवेगावबांध : येथील पर्यटन संकुल परिसरात सुमारे पाच वर्षापूर्वीच तयार केलेले गार्डन व कॉन्फरंस हॉल अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीतपणामुळे अजूनही लोकार्पणाच्या प्रतिक्षेत आहेत. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत झालेल्या आढवा बैठकीत अधिकाऱ्यांनी जानेवारीच्या अखेरपर्यंत लोकार्पण करण्ळाचे ठरविले होते. परंतु लोकार्पणाबाबत कोणत्याच हालचाली दिसून येत नसल्यामुळे पर्यटनप्रेमींमध्ये कमालाची नाराजी दिसून येत आहे.
येथे तयार करण्यात आलेल्या गार्डनमध्ये निरीक्षण मनोरे, रॉक गार्डन, वॉटर फॉल, म्युझिकल फाऊंडेशन, फुलबाग, गॅलरी आदि तयार करण्यात आलेले आहेत. परंतु याचा उपयोग मात्र पर्यटकांसाठी मुळीच झालेले नाही. येथे अजूनपर्यंत मुळीच झालेले नाही. कारण लोकार्पण न झाल्यामुळे येथील मुख्य द्वार सदैव बंदच असते. अजुनही विद्युत मिटरदेखील घेण्ळात आलेले नसल्याचे समजते. बरेच वर्षापासून बंद अवस्थेत राहिल्यामुळे आतार या गार्डनची दुरावस्था सुरू झालेली आहे.
सौंदर्यकरणासाठी लावलेले दिवे फुटलेले आहेत. मनोऱ्यांना गंज चढलेला आहे. गॅलरीला भेगा पडलेल्या आहेत. म्युझिकल फाऊंडेशनचे साहित्य देखील खराब झाल्यासारखे दिसून येते. गार्डनच्या लॉनचे व्यवस्थापन योग्य प्रमाणात करण्यात आलेले नाही. रॉक गार्डनमधील दगडांच्या अनेक मुर्त्या फुटलेल्या अवस्थेत आहे. पर्यटकांसाठी बनविलेले गार्डनची पर्यटकांविनाच दुरवस्था झालेली आहे.
कॉन्फरंस हॉल तयार होऊन उभा आकहे. योग्य व्यवस्थापन नसल्यामुळे समोरील विजेच दिवे फुटलेले आहेत. समोरील फवारा सुरुच करण्यात आला नाही. मुख्य द्वार नेहमीच बंद राहत असल्यामुळे आतमध्ये अजून काय काय फुटले आहे हे समजायला मार्ग नाही.
या दोन्ही कामात कोटीच्या घरात निधी खर्च करण्यात आल्याचे बोलले जाते परंतु तो मात्र पर्यटन विकासाच्या कामी अजून आला नाही . कारण याचा पर्यटकांना आनंदच घेता आला नाही.
प्रशासकीय अधिकारी व संबंधित कंत्राटदार यांचे लागेबांधे असल्यामुळे लोकार्पणाला विलंब होत असल्याचा आरोपही होत आहे. आढावा बैठकीत झालेल्या निर्णयानंतर लोकार्पण होणार असल्याने सर्वांच्याच आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु अधिकाऱ्यांनी मात्र गोड गोड बोलून जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचीच दिशाभूल केल्याचाही आरोप होत संबंधीत विभागाने गार्डन व कॉन्फरंस हॉलचे लोकार्पण करुन संचालन व व्यवस्थापनाची जबाबदारी एखाद्या शासकीय विभागाकडे किंवा स्वयंसेवी संस्थेकडे द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय उद्यान बचाव संघर्ष समितीतर्फे करण्यात आलेली आहे. (वार्ताहर)