-तर गोंदियाला डेंग्यु-मलेरियाचा विळखा
By Admin | Updated: July 31, 2016 00:17 IST2016-07-31T00:17:27+5:302016-07-31T00:17:27+5:30
शहरातील घाणीच्या समस्येवर तोडगा निघण्याची चिन्हे काही केल्या दिसत नाहीत. शहरात बघावे तिकडे घाणीचे ढिग लागलेले आहेत.

-तर गोंदियाला डेंग्यु-मलेरियाचा विळखा
बघावे तिकडे कचऱ्याचे ढीग
गोंदिया : शहरातील घाणीच्या समस्येवर तोडगा निघण्याची चिन्हे काही केल्या दिसत नाहीत. शहरात बघावे तिकडे घाणीचे ढिग लागलेले आहेत. मान्सूनपूर्व सफाईचाही काहीच फायदा जाणवत नाही. नाल्यांची स्थिती होती तीच आहे. परिणामी शहराला लागलेला घाणीचा विळखा कायम आहे. ही स्थिती अशीच कायम राहिली तर डासांचा प्रादुर्भाव आणखी वाढून शहरवासीयांना डेंग्यु, मलेरियाच्या आहारी जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पावसाळा हा आजारांचा काळ असतो. जलजन्य व संसर्गजन्य आजार या काळात झपाट्याने पसरतात. परिणामी पावसाळ््यात पाहिजे तेवढी स्वच्छता व त्यासोबतच सावधानी बाळगण्याचा सल्ला डॉक्टरही देतात. त्यानुसार नागरिक आपल्या घरातील स्वच्छेवर जोर देऊन ती पाळू लागतात. मात्र गोंदिया शहरातील स्वच्छतेवर कोणाचेच नियंत्रण चालत नाही. परिणामी त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
शहरात बघावे तिकडे कचऱ्यांचे ढिग लागलेले दिसत आहेत. अन्य काळात ही बाब तेवढी गंभीर वाटत नाही. मात्र पावसाळ््यात घाणीमुळे आजारांचा धोका वाढतो. आज शहरातील प्रत्येकच भागात घाणीचे ढिगार दिसून येत आहेत. यातून शहरवासीयांचे आरोग्य कितपत सुरक्षित आहे याची प्रचिती येते.
शिवाय नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाची कर्तव्यतत्परता सुद्धा यातून नजरेत येते. घाणीचे ढिगार, सांडपाण्याने तुंबलेल्या नाल्या या सर्व प्रकारामुळे शहरात एकतर नाक दाबून वावरावे लागत आहे. तसेच डासांचा प्रकोप वाढल्याने डेंग्यू व मलेरिया सारख्या आजारांच्या दहशतीत शहरवासी आपले दिवस घालवत आहेत. नगर परिषद मात्र उघड्या डोळ््याने हा प्रकार बघत असल्याने शहरवासीयांत रोष खदखदत आहे. (शहर प्रतिनिधी)
यंत्रणा ठरतेय कुचकामी
नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडे २७२ स्थायी सफाई कर्मचारी व १८ रोजंदारी कर्मचारी आजघडीला कार्यरत आहेत. तसेच निघालेल्या कचऱ्याची उचल करण्यासाठी नगर परिषदेचे सहा तर भाड्याने घेतलेले सहा ट्रॅक्टर आहेत. यातील एक ट्रॅक्टर बाजार भागासाठी असून दिवसातून तीन ट्रीप मारतो. १० ट्रॅक्टर शहरातील प्रभागांत जातात. तर एक ट्रॅक्टर इमरजंसी सेवेसाठी असतो. एवढी सर्व ताफा असतानाही शहरातील स्थिती बघता हे सर्व काही कुचकामी ठरत असल्याचेच दिसून पडते. कारण एवढे मनुष्यबळ व वाहने असतानाही शहर बकाल झाले आहे.
मान्सूनपूर्व सफाई अभियान अयशस्वी
पावसाळा सुरू होण्यापूर्वी नगर परिषदेकडून कचरा व नाल्यांची सफाई करण्यासाठी मान्सूनपूर्व सफाई अभियान राबविले जाते. विशेष म्हणजे यासाठी काही कर्मचारी व वाहन कंत्राटी तत्वावर घेतले जातात. या अभियानांतर्गत शहरातील मोठे नाले, अंतर्गत लहान नाल्यांची सफाई, त्यातील गाळ काढून बंद पडलेल्या नाल्या मोकळ््या करणे आदी कामे केली जातात. मात्र शहरातील कित्येक नाल्यांची सफाईच झालेली नसून त्या चोक पडून असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. यातून मान्सूनपूर्व सफाई अभियान फेल ठरल्याचेच दिसते.