बौध्दिक व शारीरिक सुदृढतेसाठी खेळ महत्त्वाचे- तरोणे
By Admin | Updated: December 20, 2015 01:53 IST2015-12-20T01:53:10+5:302015-12-20T01:53:10+5:30
बौध्दिक सामर्थ्यासोबत शारीरिक सुदृढताही महत्वाची असते. आर्थिक व सामाजिक उत्क्रांती साधण्यासाठी उच्चतम बुध्दीमता तोड नसते.

बौध्दिक व शारीरिक सुदृढतेसाठी खेळ महत्त्वाचे- तरोणे
अर्जुनी-मोरगाव : बौध्दिक सामर्थ्यासोबत शारीरिक सुदृढताही महत्वाची असते. आर्थिक व सामाजिक उत्क्रांती साधण्यासाठी उच्चतम बुध्दीमता तोड नसते. यालाच उत्तम आरोग्य व सृदृढ शरीराची जोड लाभली तर व्यक्तीला गगणभरारी घेणे सहज शक्य होईल. बुध्दी, आरोग्य, शारीरिक बळ जर आत्मसात करायचे असतील तर खेळरुपी शक्तीची साधना आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी केले.
कुंभीटोला येथे केंद्र क्रीडा संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, उपसभापती आशा झिलपे, जिल्हा परिषद सदस्य कमल पाऊलझगडे, पंचायत समिती सदस्य करूणा नांदगावे, विजयसिंह राठौड, जि.प. सदस्य गिरीश पालीवाल, गटशिक्षणाधिकारी स्वाती हवेले, सहकारी बँकेचे संचालक भोजराम रहेले, सेवा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष अनिल दहिवले, सरपंच पद्मा राठौड, लिलाधर ताराम, बाजू भंडारी, माजी सरपच मोरेश्वर सौंदरकर उपस्थित होते.
पुढे बोलताना तरोणे यांनी, क्रिकेट व फुटबाल प्रमाणे देशी खेळ खो-खो व कबड्डीला सरकारने प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना कराव्यात. ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तिन दिवसीय क्रिडासत्रात अनेक शाळांनी सहभाग घेतला. विजेत्या संघांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. माध्यमिक विभागातून जि.प.शाळा मोरगाव, प्राथमिक विभागात जि.प.शाळा दाभना, खो-खो क्रीडा प्रकारात मुलांमध्ये प्रथम दाभना शाळा, द्वितीय मोरगाव शाळा तर मुलींमध्ये प्रथम दाभना शाळा, द्वितीय अरततोंडी शाळा. सांस्कृतीक स्पर्धात प्रथम बाराभाटी शाळा, द्वितीय कुंभीटोला शाळा, लेझीम शोड्रीलमध्ये जि. प. शाळा क्रं.२ अर्जुनीला प्रथम तर द्वितीय क्रमांक कुंभीटोला शाळेने पटकाविला. (तालुका प्रतिनिधी)