गदारोळात गाजली ‘ग्रामसभा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 21:01 IST2017-09-03T21:00:46+5:302017-09-03T21:01:26+5:30
स्थानिक ग्रामपंचायतच्यावतीने आयोजित केलेली विशेष ग्रामसभा दोन्ही गटांनी केलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे वादळी ठरली. तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष निवडीच्या विषयावरुन सभेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

गदारोळात गाजली ‘ग्रामसभा’
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : स्थानिक ग्रामपंचायतच्यावतीने आयोजित केलेली विशेष ग्रामसभा दोन्ही गटांनी केलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे वादळी ठरली. तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष निवडीच्या विषयावरुन सभेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली. यावेळी ग्रामसेवकांसह इतरांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठले. तंमुस अध्यक्षपदाचे प्रतिस्पर्धी उमेदवार पुंडलिक भैसारे यांनी सदर ग्रामसभेत दबावतंत्राचा वापर करण्यात आल्याचे सांगत गुप्तमतदान पद्धतीने निवड प्रक्रिया करावी, अशी मागणी केली आहे.
ग्रामपंचायतच्यावतीने बाजार चौकातील सार्वजनिक समाज मंदिरात ३० आॅगस्ट रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेचे सभाध्यक्ष म्हणून डॉ. शामकांत नेवारे यांची निवड केली गेली. ग्रामसभेला गावातील हजारोंच्यावर महिला-पुरुषांची उपस्थिती होती. विषय सुचीनुसार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यादीचे प्राधान्यक्रम ठरवून अग्रक्रमाने यादी तयार करणे यासंबंधी यादीचे वाचन करुन सर्वानुमते ठराव मंजूर केला.
महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे पूर्नगठन (१/३ सदस्य) बदलविण्याबाबत चर्चा करणे हा विषय मांडून समितीच्या अध्यक्ष पदासाठी नाव सूचविण्याची घोषणा केली. त्यानुसार एका गटातून कुकसू मेश्राम यांनी माजी पं.स. सदस्य प्रमोद पाऊलझगडे यांचे नाव तर दुसºया गटातून अशोक रामटेके यांनी पुंडलिक भैसारे यांचे नाव सुचविले. हातवर करुन निवडणूक घेऊ असे सभाध्यक्षांनी जाहिर केले. यावर दुसºया गटाने लोकशाही पद्धतीने गुप्त मतदान पद्धतीने निवड प्रक्रिया करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यानुसार गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेण्याचे ठरले.
निवडणूक प्रक्रियेत दुपारच्या १ ते २ वाजतापर्यंत मतदार नोंदणीसाठी वेळ देण्यात आला. काहींनी यावर आक्षेप घेऊन गुप्त मतदान पद्धतीला विरोध केला. दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी सभेच्या दर्शनीस्थळी जाऊन परस्परांच्या हातून माईक ओढतान करुन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
सभेत गोंधळाचे चित्र निर्माण झाले. अशा गदारोळात सभाध्यक्षानी पाऊलझगडे विजयी झाल्याचे घोषित केले. तर दुसºया गटाच्या समर्थकांनी भैसारे विजयी झाल्याची घोषणा करुन टाळ्या वाजविल्या. ग्रामसभेच्या निर्णयापूर्वीच दर्शनी भागातील ग्रामसेवकांसह ईतरांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठले. एकंदरीत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाच्या निवडीला घेऊन बोलाविण्यात आलेली ग्रामसभा वादळी ठरली आहे.
ग्रामसभाध्यक्षांचा निर्णय अमान्य
ग्रामपंचायतच्यावतीने आयोजित ग्रामसभेत तंमुस अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेत सभाध्यक्षांनी दबावतंत्राचा वापर करुन कोणतीही निवडणूक प्रक्रिया न घेता स्वमर्जीने प्रमोद पाऊलझगडे विजयी झाल्याचे घोषित केल्याचा आरोप होत आहे. तंटामुक्त अध्यक्षपदाला घेऊन भैसारे यांनी चौकशी करुन न्याय देण्याची मागणी केली आहे.
बोंडगावदेवी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने झाली. ग्रामसभेत ही निवड झाली आहे.
एल.एम. ब्राम्हणकर
ग्रामसेवक, बोंडगावदेवी.