तंबाखू मुक्तीसाठी लोकचळवळ
By Admin | Updated: August 7, 2015 01:43 IST2015-08-07T01:43:13+5:302015-08-07T01:43:13+5:30
तंबाखू खाण्यामुळे कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराला बळी पडावे लागते. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील महिला सुद्धा तंबाखूचे सेवन

तंबाखू मुक्तीसाठी लोकचळवळ
जिल्हाधिकारी सूर्यवंशी : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम
गोंदिया : तंबाखू खाण्यामुळे कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराला बळी पडावे लागते. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील महिला सुद्धा तंबाखूचे सेवन मोठ्या प्रमाणात करतात. जिल्ह्यातील कोणताही व्यक्ती तंबाखुचे सेवन करणार नाही यासाठी जिल्ह्यात तंबाखू मुक्तीची लोकचळवळ उभी करणे आवश्यक आहे, असे मत जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
४ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि राष्ट्रीय नियंत्रण कायदा २००३ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयोजित जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या सभेला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवि धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीश कळमकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) शरद खंडागळे, पोलीस उपअधिक्षक (गृह) सुरेश भोयर, गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी जी.एन.वाहुरवाघ, अन्न सुरक्षा अधिकारी व्ही.टी. भावड, प्रभारी सहायक कामगार आयुक्त उज्वल लोया, आयएमएचे जिल्हाध्यक्ष डॉ.तुरकर, डॉ.विद्यासागर, डॉ. संजय भगत, प्रमोद गुडधे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. सूर्यवंशी यांनी, जिल्ह्यातील १८ ते ४५ वयोगटातील ४४ हजार व्यक्ती धुम्रपान करीत असल्याचे एका अहवालात स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात तंबाखू खाण्याची सवय सोडविण्यासाठी एक केंद्र सुरु करण्यात येणार आहे. तंबाखु विरुद्ध लढण्यासाठी आता सर्वांनी सज्ज व्हावे. महिलांनी तंबाखुच्या व्यसनापासून दूर रहावे. महिला आर्थिक विकास महामंडळ आणि जीवन्नोती अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना जीवन कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येईल.
शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना तंबाखु सेवनाच्या दुष्परिणामाची जाणिव करुन द्यावी असेही त्यांनी सांगीतले. तसेच, शाळांमध्ये तंबाखू विरोधी वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा आयोजित करावी. प्रथम शिक्षकांचे याबाबत प्रबोधन करुन त्यांनाही गुटखा खाण्यापासून दूर राहण्यास सांगावे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण होण्यास मदत होईल. शाळा महाविद्यालयाच्या १०० मीटर परिसरात असलेले पानठेले हटविण्यासाठी पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने काम करावे.
जिल्ह्यात १७ ते २३ आॅगस्टच्या सप्ताह दरम्यान शाळा, महाविद्यालयाच्या परिसरातील पानठेल्यांची आकस्मीक तपासणी करुन पानठेल्यांमधून तंबाखू व गुटखा विक्री होत नसल्याची खात्री करण्यात येईल. विक्री होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित पानठेला मालकावर कडक कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगीतले.
जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.धकाते यांनी, प्रास्ताविकातून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले. यासाठी सेवाभावी संस्थांना सुद्धा या कार्यक्रमात सहभागी करुन घेण्यात यईल. जिल्ह्यात विविध आजारांच्या रुग्णांना चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याचा आपला प्रयत्न राहणार असून भविष्यात गोंदिया येथे सूपर स्पेशालिटी हॉस्पीटल झाल्यास चांगली आरोग्य सुविधा विविध रुग्णांना उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. (शहर प्रतिनिधी)