चार अपघातांत चार ठार
By Admin | Updated: June 4, 2014 00:08 IST2014-06-04T00:08:24+5:302014-06-04T00:08:24+5:30
जिल्ह्यातील तिरोडा, केशोरी, देवरी व रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत घडलेल्या विविध अपघातांत चौघे ठार झाले. सोमवारी व मंगळवारी हे अपघात घडले असून मारोती कोदू मेश्राम (२४), अवेद खॉ

चार अपघातांत चार ठार
जिल्हा हादरला : तिरोडा, केशोरी, देवरी व रावणवाडी येथील घटना
गोंदिया : जिल्ह्यातील तिरोडा, केशोरी, देवरी व रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत घडलेल्या विविध अपघातांत चौघे ठार झाले. सोमवारी व मंगळवारी हे अपघात घडले असून मारोती कोदू मेश्राम (२४), अवेद खॉ जलील खॉ पठाण (२५,रा. वाढवी), कांता गोपालराव मेश्राम (५२,रा.देवरी) व दिलीप भाकचंद सहारे (५४,रा. दासगाव) असे मृतांचे नाव आहे.
यामध्ये पहिल्या घटनेत, तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत भजेपार येथे सोमवारी सायंकाळी ५ वाजता दरम्यान ट्राली एम.एच. ३५/५४७१ असलेल्या विन क्रमांकाच्या ट्रॅक्टरने सायकलस्वार मारोती मेश्राम (२४) यांना धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊन मारोती यांचा मृत्यू झाला. ट्रॅक्टर चालकाविरूध्द तिरोडा पोलिसांनी भादंविच्या कलम २७९, ३0४ (अ), सहकलम १८४ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
दुसर्या घटनेत, केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत परसटोला येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला दुचाकी धडकल्याने मोटारसायकल चालक जागीच ठार झाला. अवेद खॉ जलील खॉ पठाण (२५,रा.वाढवी) हे मोटारसायकल एम.एच.३४/टी.६१४0 ने भरधाव वेगात जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मोटारसायकल रस्त्याच्या कडेला झाडाला धडकली व यातच गंभीर जखमी होऊन अवेद पठाण यांचा मृत्यू झाला.
या घटनेसंदर्भात केशोरी पोलिसांनी भादंविच्या कलम २७९, ३0४ (अ) सहकलम १८४ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
तिसर्या घटनेत, देवरी येथे पोलीस ठाण्यासमोर ट्रकच्या तावडीत येऊन शिक्षिका ठार झाली आहे. मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास शिक्षिका कांता मेश्राम (५२,रा. वार्ड क्र. ६, देवरी) यांची पुतणी ग्रामीण रुग्णालयात भर्ती असल्याने तिला बघण्यासाठी त्या पुतण्या संदीप प्रकाश मेश्राम (२७) याच्या सोबत मोटारसायकल एमएच ३५ / ई ३१0५ ने रूग्णालयात जात होत्या. दरम्यान याच रस्त्याने जात असलेल्या ट्रक क्रमांक एमएच ३५/ के ५६८ ला ओव्हरटेक करण्याच्या नादात संदीपची मोटारसायकल घसरली. यात कांता मेश्राम या ट्रकच्या चाकाखाली आल्या व त्यांचा जीव गेला. तर संदीप बाजूला पडल्याने त्याचा जीव बचावला. या घटने संदर्भात ट्रक चालक जिब्राईल शेख मोहमद शेख (३८,रा. सेलटेक्स कॉलोनी, गोंदिया) यांच्या विरुद्ध देवरी पोलिसांनी भादंविच्या कलम २७९, ३३७, ३0४ (अ) सह कलम १८४ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ट्रक चालक देवरी येथील धान भरुन गोंदियाकडे येत होता. संदीप ने दुचाकीला ट्रकच्या डाव्या बाजूने ओव्हरटेक केल्यामुळे सदर अपघात घडल्याचे बोलले जात आहे.
तर चौथ्या घटनेत, रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत दासगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम ठार झाला. सोमवारच्या रात्री ९ वाजता दरम्यान घडलेल्या या घटनेत खारीगरम विक्री करुन आपल्या घरी पायी जाणार्या दिलीप भाकचंद सहारे (५४, रा. दासगाव) यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते जागीच ठार झाले. हरेंद्र दिलीप सहारे यांच्या तक्रारीवरुन सदर घटनेसंदर्भात रावणवाडी पोलिसांनी भादंविच्या कलम २७९, ३0४ (अ) सहकलम १३४ मोटारवाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)