चार दिवसांची कमाई ८४.५० लाख

By Admin | Updated: November 16, 2016 01:14 IST2016-11-16T01:14:11+5:302016-11-16T01:14:11+5:30

कर थकबाकीसाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया नगर पालिकेच्या तिजोरीत कोणत्याही विशेष परिश्रमाशिवाय शहरातील नागरिक

Four days earnings 84.50 lakh | चार दिवसांची कमाई ८४.५० लाख

चार दिवसांची कमाई ८४.५० लाख

गोंदिया पालिकेला ‘अच्छे दिन’ : १० दिवसांत आणखी आवक वाढणार
गोंदिया : कर थकबाकीसाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया नगर पालिकेच्या तिजोरीत कोणत्याही विशेष परिश्रमाशिवाय शहरातील नागरिक आपला थकीत कर भरत आहेत. नोटाबंदीनंतर ५०० आणि १००० च्या नोटांमधून न.प.चा मालमत्ता कर भरण्यास शासनाने मुभा दिल्यानंतर दि.११ ते १४ या चार दिवसात ८४.५० लाख रुपयांचा कर नगर पालिकेकडे जमा झाला. ही मुदत आणखी १० दिवस वाढल्यामुळे अवघ्या पंधरवड्यात गोंदिया पालिकेला दोन कोटींची कमाई होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
शासनाने ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातच सध्या दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले आहेत. यात कुणी जुन्या नोटा बदलवून घेण्यासाठी किंवा त्यांना वापरण्याची कसरत करीत आहेत, तर कुणी नवीन नोटा मिळविण्यासाठी धावपळ करीत आहेत. खरी कसरत मात्र ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात ५०० व १००० रूपयांच्या नोटा आहेत त्यांची सुरू आहे. चलनातून बाद झालेल्या ५०० व १००० रूपयांच्या नोटा कुणी स्वीकारत नसल्याने त्या नोटांना चालवून घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अशात शासनाने शासकीय कार्यालयांना कर स्वरूपात जुन्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले. यामुळे जुन्या नोटांचा वापर कर भरणा स्वरूपात केला जात आहे. नेमका याचाच फायदा नगर परिषदेला मिळाला.
अगोदर ११ नोव्हेंबर रोजी जुन्या नोटा कर स्वरूपात स्वीकारण्याचे आदेश आले होते. त्या दिवशी मध्यरात्री १२ वाजतापर्यंत नगर परिषदेने जुन्या नोटा स्वीकारल्या. त्यात पालिकेला ३३ लाख रूपयांची आवक झाली. यात मालमत्ता करापोटी पालिकेला २२ लाख तर बाजार किरायातून ११ लाख रूपये मिळाले. त्यानंतर शासनाने आणखी तीन दिवसांची मुदतवाढ करून दिली. यात














१२ नोव्हेंबर रोजी पालिकेला मालमत्ता करापोटी तीन लाख ५० हजार रूपये व बाजार किरायातून दोन लाख रूपये असे एकूण पाच लाख ५० हजार रूपये मिळाले.
१३ नोव्हेंबर रोजी मालमत्ता करातून १२ लाख रूपये व बाजार किरायातून चार लाख रूपये असे एकूण १६ लाख रूपये मिळाले. तर १४ नोव्हेंबर रोजी मालमत्ता करातून २५ लाख रूपये व बाजार किरायातून पाच लाख रूपये असे एकूण ३० लाख रूपये मिळाले आहेत.
विशेष म्हणजे यात ११ नोव्हेंबर रोजी म्हणजेच्या पहिल्या दिवशी ३३ लाख व अंतिम दिन १४ नोव्हेंबर रोजी ३० लाख रूपयांची आवक झाली असून एकूण ८४ लाख ५० हजार रूपये पालिकेच्या तिजोरीत आले आहेत. (शहर प्रतिनिधी)

२४ तारखेपर्यंत मुदतवाढ
५०० व १००० रूपयांच्या नोटा स्वीकारण्यासाठी शासनाकडून चार दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असतानाच आता त्यात आणखी १० दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांना येत्या २४ तारखेपर्यंत जुन्या नोटा स्वीकारता येणार असून तसे आदेश आले आहेत. चार दिवसांच्या या मुदतवाढीमध्ये पालिकेच्या तिजोरीत ८१.५० लाख रूपये आल्याने येत्या १० दिवसांत त्यात आणखी भर पडून जवळपास दोन कोटींची थकित करवसुली होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वसुली कर्मचारी थकबाकीदारांकडे जाणार
थकबाकीदारांकडून कराचा भरणा करण्यासाठी जुन्या ५०० व १००० च्या नोटांचा वापर होत असल्याने यात नगर परिषद व थकबाकीदार अशा दोघांचाही फायदा आहे. त्यामुळे पालिका उर्वरीत थकबाकीदारांना कराचा भरणा करण्यासाठी प्रोत्साहीत करणार आहे. यासाठी नगर परिषदेचे कर वसुली कर्मचारी आपापल्या वॉर्डातील थकबाकीदारांकडे जाणार आहेत. हे कर्मचारी थकबाकीदारांकडे जाऊन त्यांना मिळालेल्या अवधीत कराचा भरणा करण्यासाठी प्रोत्साहीत करतील. थकबाकीदारांच्या सुविधेसाठी वाढविण्यात आलेल्या १० दिवसांत रात्री ८ वाजतापर्यंत पावती देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: Four days earnings 84.50 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.