गोंदिया जिल्ह्यात मारबत विसर्जनानंतर अंघोळीसाठी नदीत उतरलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 20:20 IST2021-09-07T20:16:04+5:302021-09-07T20:20:52+5:30
Gondia News नदीवर मारबत घेऊन गेल्यानंतर अंघोळीसाठी नदीत उतरलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाला. आमगाव तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथील वाघ नदीत मंगळवारी (दि.८) सकाळी ८ वाजेदरम्यान ही घटना घडली.

गोंदिया जिल्ह्यात मारबत विसर्जनानंतर अंघोळीसाठी नदीत उतरलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नदीवर मारबत घेऊन गेल्यानंतर अंघोळीसाठी नदीत उतरलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाला. आमगाव तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथील वाघ नदीत मंगळवारी (दि.८) सकाळी ८ वाजेदरम्यान ही घटना घडली. मयूर अशोक खोब्रागडे (२०), सुमित दिलीप शेंडे (१७), संतोष अशोक बहेकार (१९) व बंडू किशोर बहेकार (१६, सर्व रा. कालीमाटी) अशी मृत मुलांची नावे आहेत. (Four children drowned in Gondia district)
बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत काढली जात असून सकाळी घरातून काढण्यात आलेली मारबत गावातील शिवारात नेऊन टाकली जाते. त्यानुसार, आमगाव तालुक्यातील ग्राम कालीमाटी येथील शंभरावर मुले गावातील शिवारावर मारबत घेऊन गेले होते. तेथे गेल्यावर आंघोळीसाठी मयूर खोब्रागडे, सुमित शेंडे, संतोष बहेकार, बंडू बहेकार व अन्य काही मुले नदीत उतरली. ते नदीत उतरल्यावर पावसाला सुरुवात झाली व वीज चमकत असल्याने काही मुले तेथून घरी परत आली.
मात्र, नदीतील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने मयूर खोब्रागडे, सुमित शेंडे, संतोष बहेकार व बंडू बहेकार यांचा बुडून मृत्यू झाला. पाण्याच्या प्रवाहात ते वाहून गेले असून, आमगाव पोलीस मृतदेहांचा शोध घेत आहेत. मात्र, वृत्त लिहीपर्यंत त्यांचे मृतदेह हाती लागले नसल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकूल यांनी दिली.